भंडारा, अमरावती : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असला, तरी समन्वय समितीचा हा निर्णय अमान्य करीत भंडारा आणि अमरावतीत संपकर्त्या कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नसून अशाप्रकारे संपकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर संप मागे घेणे म्हणजे दगा असल्याची प्रतिक्रिया भंडारातील संपकऱ्यांनी दिली.
अमरावतीत संपकर्त्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून संप मागे घेण्यास नकार दर्शवला आहे. काही संपकर्त्या कर्मचाऱ्यांनी सुकाणू समितीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडण देखील केले. काही संपकर्त्या कर्मचाऱ्यांनी रात्री जिल्हा परिषदेसमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी देखील केली. सरकारने जुनी पेन्शन लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर करावा, त्यानंतरच संप मागे घेण्यात येईल, असे संपकर्त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.