भंडारा : पिकांना सिंचनासाठी शेतात विहीर केली आहे. या विहिरीत लावलेला विद्युत मोटार पंप बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मऱ्हेगाव शेत शिवारात घडली.
पालांदूर येथील छगन रामकृष्ण गोटेफोडे (वय ४५) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. छगन गोटेफोडे हे अंतराम गायधने यांच्या शेतात कामासाठी जात असत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान अंतराम गायधने यांच्या मऱ्हेगाव येथील शेतातील विहिरीत पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले. घटनेच्या दिवशी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान गायधने यांच्या शेतातील पाण्यात बुडून खराब झालेला मोटार पंप काढून दुरुस्त करण्यासाठी छगन विहिरीत उतरले होते.
शेतकरी छगन हे विहिरीत उतरले असता यावेळी विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूने विहिरीत त्यांचा जीव गुदमरायला लागला. यात त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मोटारपंप बाहेर काढण्यासाठी शेतकरी विहिरीत उतरून विहिरीत साचलेल्या पाण्यात पडले असता शेतात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांना दिली.
तहसीलदार धनंजय देशमुख व पालांदूरचे ठाणेदार बनसोड यांच्या उपस्थितीत अग्नी अग्निशमन अधिकारी समीर गणवीर यांच्या नेतृत्वात रवी, अमित, विलास, प्रणय या अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य मोहीम हाती घेत शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. कर्ता पुरुष गमावल्याने गोटेफोडे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.