भंडारा : शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर ४५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना उसाचे चुकारे देणे बंधनकारक आहे. असे असताना सहा महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.
साकोली झोनमधील साकोली, एकोडी, सानगडी येथील शेतकऱ्यांनी देव्हाडा येथील मानस ऍग्रो इंडस्ट्री या साखर कारखान्यामध्ये ऊस देऊन सहा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना उसाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून आज शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन करत मानस ऍग्रो इंडस्ट्रीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गावोगावातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देव्हाडा येथील मानस ऍग्रो इंडस्ट्री साखर कारखान्याला ऊस विक्री केला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर ४५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना संपूर्ण उसाचे चुकारे देणे हे बंधनकारक आहे. परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अजूनही उसाचे पैसे देण्यात आले नाही. या दरम्यान अनेकदा पैशांची मागणी देखील केली.
शेतकऱ्यांकडून १५ दिवसांचा अल्टिमेटम
साखर कारखान्याने सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील उसाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. चुकारे मिळावे या मागणीसाठी साकोली येथे मानस कार्यालयावर आंदोलन केले. पंधरा दिवसाच्या आत चुकारे न मिळाल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी त्वरित उसाची चुकारे मिळावे यासाठी मुख्य कार्यकारी व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
तर साखर कारखान्यावर भव्य मोर्चा
सुमारे सत्तर पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी साकोली येथील मानस ऍग्रो इंडस्ट्रीच्या कार्यालयावर आंदोलन करून कार्यालयाला कुलूप ठोकले. साकोली झोन प्रभारी मुकेश वाडीभस्मे यांनी त्वरित चुकारे देण्याचे आश्वासन दिल्याने कुलूप उघडण्यात आले. मात्र २५ मे पर्यंत संपूर्ण उसाचे चुकारे १५ टक्के व्याजासकट शेतकऱ्यांना द्यावे; अन्यथा साकोली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी २७ मे रोजी देव्हाडा येथील ऊस कारखान्यावर भव्य मोर्चा काढतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे.