भंडारा : फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध करत विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक आणि तांत्रिक अशा पाचही विद्या शाखांमधून एकत्रित पहिल्या तिन्ही स्थानांवर त्यांच्या विद्यार्थिनींनी त्यांचे नाव कोरले.
नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखेच्या आन्या रणजित उजवने हिने ९७.८३ टक्के गुण मिळवून संपूर्ण जिल्ह्यात सर्व शाखांमध्ये एकूण प्रथम क्रमांक पटकावला. त्याच महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या मधू नरेश अंगवानी हिने ९७.६७ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला तर प्रांजु चंद्रकुमार बलवानी हिने ९४.६७ टक्के गुणांसह तिसरे स्थान मिळवले. विज्ञान, वाणिज्य, कला, वोकेशनल आणि तांत्रिक अशा सर्व शाखांमध्ये नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व राखले.
विज्ञान शाखेतून अथर्व देशमुख जिल्ह्यात प्रथम
विज्ञान शाखेत गांधी कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथील अथर्व अनिल देशमुख याने ९२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. संत गुलाब बाबा डिफेन्स सर्व्हिसेस अॅकॅडमीचा विद्देश राहीगुडे याने ९१.६७ टक्के गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले. लॉर्ड्स पब्लिक स्कूलची शुभदा शरद शेंडे हिने ९१.५० टक्के गुण घेत जिल्ह्यात तीसरे स्थान प्राप्त केले तसेच नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची शर्वरी नारायण जुवार हिने ९१.१७ टक्के गुण प्राप्त केले.
कला शाखेतून मानसी कोवे अव्वल
कला शाखेत देखील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाने पहिले 3 क्रमांक पटकावून आपले वर्चस्व राखले. मानसी संजय कोवे हिने ९३.८३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर साहिली लव झंझाडे हिने ८९.३० टक्के गुणांसह जिल्ह्यात दुसरा आणि लोकेशा मुरलीधर नंदरधने हिने ८९.५० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.
१४,३९७ विद्यार्थी उत्तीर्ण
या वर्षी भंडारा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.५८ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या ९४.६८ टक्क्यांच्या तुलनेत निकालात ७.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. यंदा जिल्ह्यातील १६,५१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी १६,४३८ विद्यार्थी उपस्थित राहिले व त्यामधून १४,३९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ७,२८४ मुली असून मुलींचे उत्तीर्ण टक्केवारी ९१.९६ असून ती मुलांपेक्षा (८३.५० टक्के) अधिक आहे.
भंडारा तहसील अव्वल
तहसीलनिहाय निकालात भंडारा तहसीलने ९५.९३ टक्के निकालासह अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर साकोली (९०.२३%), मोहाडी (८७.५४%), पवनी (८५.६४%), लाखनी (८३.०८%), तुमसर (८२.८९%) तर लाखांदूर तहसीलचा सर्वात कमी निकाल ७५.५६ टक्के लागला आहे.
शाखानिहाय निकाल
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.७३% लागला. वाणिज्य शाखा ८७.५८%, कला शाखा ७४.३५%, वोकेशनल (MCVC) ८२.८१% आणि तांत्रिक शाखा ८१.४४% टक्के निकालासह यशस्वी ठरल्या.