भंडारा : नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस सुरू झाली असून, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत चालला आहे. कारण अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात. सभा सजवणे, पोस्टर लावणे, प्रचार करणे, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे अशा प्रत्येक स्तरावर ते झटत असतात. मात्र तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी, आर्थिक ताकद आणि वरच्या स्तरावरील शिफारशी यांना प्राधान्य मिळत असल्याने खऱ्या अर्थाने पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते उपेक्षित ठरत आहेत. शेवटी “तू तर आपला आहेस!” हे एकच वाक्य निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळते, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
“जनसेवा करणाऱ्यांना नाही, पैशवाल्यांना संधी !”
पक्षासाठी झटणारे अनेक कार्यकर्ते सांगतात की, “आम्ही वर्षानुवर्षे जनतेत काम केले, पण आता उमेदवारी ठरविताना पैशांची ताकद आणि खर्च करण्याची क्षमता यांनाच प्राधान्य दिले जाते.” एका स्थानिक कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “पैशाने श्रीमंत लोकांना उमेदवारी मिळते, पण बूथपातळीवर काम करणाऱ्यांना दुर्लक्षित केले जाते. हा अन्याय आहे!”
“जनतेच्या प्रेमावर आमचा ठेवा !”
निष्ठावंत कार्यकर्ते म्हणतात, “आम्ही मनाने श्रीमंत आहोत. जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा आमच्याकडे ठेवा आहे. पैसा नसला तरी आम्ही समाजासाठी काम करतो.” काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला, “जर पैशाच्या जोरावर उमेदवारी वाटप झाली, तर आम्ही अपक्ष म्हणून मैदानात उतरण्यास तयार आहोत!”
“राजकारणातून सेवा गायब, सत्ता केंद्रस्थानी”
राजकीय जाणकारांच्या मते, गेल्या काही वर्षांत राजकारणातील सेवाभाव हरवला असून सत्तेची लालसा आणि आर्थिक व्यवहार यांनाच प्राधान्य मिळाले आहे. पूर्वी कार्यकर्त्यांची लोकप्रियता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी पाहून उमेदवारी ठरत असे; परंतु आता “विजयासाठी पैसा आवश्यक” हीच नवी व्याख्या बनली आहे.
पक्ष नेतृत्वाचे मौन..
या सर्व परिस्थितीवर पक्षनेत्यांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र पक्ष कार्यालयांपुढे कार्यकर्त्यांच्या बैठका, चर्चा आणि नाराजीचे सत्र रंगताना दिसत आहे. “पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकणारे समाजसेवक नव्हे, व्यापारी ठरतात,” असे तिखट वक्तव्य काही कार्यकर्त्यांनी केले आहे. “उमेदवारी न मिळाली तरी जनसेवा आमचे ध्येय आहे. पैसा निवडणूक जिंकवतो, पण मन जिंकण्यासाठी प्रामाणिक सेवा लागते. ”जनतेला खरा सेवक ओळखता येतो, आणि योग्य वेळी ती उत्तर देते, असा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांनी व्यक्त करत पैशाच्या राजकारणात दबलेले सेवाभावी कार्यकर्त्यांनी अजूनही आशा सोडलेली नसून आगामी निवडणुका या तत्त्वनिष्ठ आवाजाला नवा रंग देतील, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
