भंडारा : नुकताच गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात पार पडला. दहा दिवस भक्तीभावाने पूजा केलेल्या लाडक्या बाप्पााला अनंत चतुर्दशीला भाविकांनी निरोप दिला. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीही विसर्जित करण्यात आले. विसर्जनासाठी भंडारा नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कृत्रिम टाक्या तयार करून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र विसर्जनानंतर आता खंडित झालेल्या पीओपीच्या मुर्त्या विखुरलेल्या अवस्थेत परिसरात पडून आहेत तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे सगळेच सण, उत्सव पर्यावरणपूरक कसे करायचे यावर विचार मंथन होत असताना आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर गणेशमूर्तीसाठी केला जातो. त्यामुळे विसर्जनानंतर पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. भंडारा येथील बहिरंगेश्वर मंदिर ही भंडाऱ्याची ग्रामदेवता असून सध्या या परिसरात विसर्जनानंतर विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. यासाठी नगरपालिका प्रशासना सोबतच नागरिकही जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटत आहेत.

शहरात गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने पार पडले. भंडारा नगर परिषदेने शहरातील पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. यामध्ये मिस्कीन टँक गार्डन, खांब तलाव, पिंगलाई तलाव, सागर तलाव आणि वैनगंगा नदीचा समावेश होता. यापैकी पर्यावरणाची हानी होऊ नये आणि विसर्जन योग्यरित्या करता यावे म्हणून मिस्कीन टँक गार्डन, खांब तलाव आणि पिंगलाई तलाव येथे कृत्रिम तलाव बांधण्यात आले. या ठिकाणी भाविकांनी बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले.

अनेक भाविकांनी नगर परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुकही केले, परंतु गणेशोत्सव संपताच दोन दिवसांत सर्व व्यवस्था कोलमडून पडली. आज परिस्थिती अशी आहे की विसर्जन स्थळांवर अनागोंदी, घाण आणि कचऱ्याचे ढीग दिसून येतात. एवढेच नाही तर पीओपीच्या मुर्त्याही विखुरलेल्या आणि खंडित अवस्थेत पडून आहेत. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे आता भाविक आणि नागरिकांना त्रास होत आहे.

खांब तलाव परिसरात सौंदर्यकरणाचे काम झाल्यानंतर तलावात पाणी नाही, त्यामुळे या ठिकाणी कृत्रिम टाक्यांची निर्मिती करून गणेश विसर्जनाची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने केली जाते. यावेळी नागरिकांना पीओपीच्या मुर्त्यांचे विसर्जन करू नये असे आवाहनही केले जाते. आज सकाळी या परिसरातील सुषमा मुंदरा या जागरूक महिलेने विसर्जनानंतर बहिरंगेश्वर मंदिरासमोर पसरलेल्या अस्वच्छतेचे चित्रीकरण करून संताप व्यक्त केला आहे. विसर्जनानंतर या परिसरात सर्वत्र चिखल, कपड्यांचे तुकडे, निर्माल्य आणि खंडित झालेल्या पीओपीच्या मुर्त्या विखुरलेले आहेत. त्यामुळे परिसरात प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यात नेमकी चूक कोणाची असा प्रश्न आहे आता उपस्थित होत आहे.

मिस्कीन टँक गार्डन परिसरातील स्थितीही अत्यंत संतापजनक आहे. येथे दोन कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले होते, एक जुना आणि दुसरा नवीन. नवीन टँक घाईघाईत बांधण्यात आला होता आणि विसर्जनानंतर त्याच घाईघाईत तो पाडण्यात आला. आता तिथे माती, विटा, लोखंडाचे तुकडे, कपडे आणि सिमेंटचे अवशेष विखुरलेले आहेत.

जुन्या टाकीची स्थितीही समाधानकारक नाही. ही टाकी सुमारे तीन वर्षांपूर्वी फुटली होती. तेव्हापासून ती फक्त दुरुस्ती करून वापरली जात आहे. त्यातून पाणी गळत राहते. त्यामुळे नगरपालिका आणखीन किती का अशाच जुन्या टाक्या विसर्जनासाठी वापरणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

यावेळीही भंडारा नगर परिषदेने तुटलेल्या निर्माल्य कलशाचा वापर केला. विसर्जनानंतर त्यात काही घाण शिल्लक राहते, परंतु बहुतेक निर्माल्य थेट हिरव्या आणि निळ्या कचराकुंड्यांमध्ये टाकण्यात आले. निर्माल्यसाठी स्वतंत्र व्यवस्था न करणे ही नगर परिषदेची गंभीर चूक म्हणता येईल.

प्रदूषण आणि अराजकतेमुळे चिंता वाढली

विसर्जनानंतर सोडल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे तलाव आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाचा धोका वाढला आहे. कपडे, माती आणि इतर साहित्य तिथेच पडले आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.

भक्तांच्या भावनांचा प्रश्न..

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर समाजाच्या श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत विसर्जनादरम्यान स्वच्छता आणि आदरयुक्त व्यवस्था आवश्यक आहे. तुटलेले हौद, तुटलेले कलश आणि कचऱ्याच्या डबक्यात पडलेले निर्माल्य यामुळे भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसतो. नागरिकांचे म्हणणे आहे की जर नगर परिषदेने या कार्यक्रमाला गांभीर्याने घेतले नाही, तर येणाऱ्या काळात लोकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो.