भंडारा: महिला सुरक्षिततेला चालना देण्यासाठी आणि छेडछाड, हिंसा किंवा गैरवर्तनाच्या तक्रारींवर लगेच कारवाई व्हावी यासाठी भंडारा पोलिसांनी आज एक नवीन व्हॉट्सएप-आधारित सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे महिला आणि मुली त्यांच्या मातृभाषेत (मराठी) थेट पोलिसांशी संपर्क साधून आणीबाणीत मदत मागू शकतात. ७४४७४७०१०० या व्हॉट्सएप क्रमांकावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ नंतर आता भंडारा पोलिसांनी महिला सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून या नव्या अँपची निर्मिती केली आहे. पीडित महिला किंवा तरुणी वरील व्हॉट्स ॲप क्रमांकावर मेसेज पाठवून आपल्या भाषेत मदत मागू शकतील.

महिलांना आणीबाणी प्रतिसाद, छेडछाड, छळाची तक्रार किंवा सल्ल्यासाठी तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे. हा संवाद गोपनीय राखला जाणार असून तांत्रिक सहाय्य आणि स्थानिक पोलीस स्टेशनशी ताबडतोब संपर्क साधला जाईल. आणीबाणीच्या परिस्थितीत महिला व्हॅन किंवा पोलीस टीम त्यांचे स्थान व्हॉट्सएपद्वारे शेअर करून त्वरित पोहोचू शकतील.

कसे वापराल?

व्हॉट्सएपवर ७४४७४७०१०० हा क्रमांक सेव्ह करा. त्यावर “मदत” किंवा “सहाय्य” टाइप करून मेसेज पाठवा. भाषा (मराठी) निवडा आणि आपल्या गरजेनुसार मार्गदर्शन प्राप्त करा.

उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी

सायबर बॉट या भंडारा सायबर सेलच्या वतीने पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतून ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ सुरू करण्यात आली. ही सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांसाठी भंडारा पोलिसांचे अभिनंदन केले होते. या सायबर बॉट मुळे नागरीकांच्या समस्यांसाठी तात्काळ सहाय्य, सामान्य शंका आणि प्रश्नांना उत्तर मिळत असून त्यामुळे नागरीकांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, सायबर धोके आणि वित्तीय फसवणुक याबाबत माहिती मिळत आहे.