एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील घराघरात शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करते, मात्र भंडारा शहरात उलटेच घडले. सुस्थितीत आणि वापरात असलेल्या शौचालयावर पालिकेने बुलडोझर चालविला. शुक्रवारी प्रभागातील ३५ ते ४० वर्ष जुने सार्वजनिक शौचालय पालिकेने नोटीस न देताच जमीनदोस्त केले. या प्रकारानंतर बराच वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. संतप्त महिलांनी बुलडोझर अडविण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे देखील वाचा – अकोला : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना तरुणीचा मैदानातच मृत्यू

शहरात मोजकेच सार्वजनिक शौचालये आहेत. शुक्रवारी प्रभागात ३५ वर्ष जुने १५ ते २० शौचालये आहेत. आजवर दोन वेळा पालिकेकडून या शौचालयाची डागडुजी करण्यात आली. या परिसरात ६ ते ७ पानटपऱ्या असून येथे येणारे सर्व ग्राहक या शौचालयाचा वापर करतात तसेच जवळच किसान चौक असून दररोज सकाळच्या वेळी मजूर महिला या ठिकाणी गोळा होतात. या महिलांनाही हे शौचालय सोयीचे पडायचे. मोक्याच्या ठिकाणी असलेले आणि नागरिकांना सोयीचे असे हे शौचालय कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना घेराव करून जाब विचारला. त्यावेळी, शौचालय पाडून त्या जागी वाचनालय आणि व्यायामशाळा बांधकाम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शौचालय पाडण्याचे आदेश आणि वाचनालय बांधकामाच्या प्रस्तावाची प्रत दाखविण्याची आग्रही मागणी नागरिकांनी केली असता मुख्याधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. उलटपक्षी शौचालयाचा वापर करणाऱ्यांच्या नावांची यादी पालिकेला द्या, अशी अफलातून सूचना मुख्याधिकाऱ्यानी केली.

हे देखील वाचा – नागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली सुपारी

शौचालयाच्या अगदी काही अंतरावर आमदाराचे घर आणि त्यांचे नर्सिंग महाविद्यालय –

या शौचालयाच्या अगदी काही अंतरावर आमदाराचे घर आणि त्यांचे नर्सिंग महाविद्यालय आहे. महाविद्यालयासाठी आमदारांनी नुकतीच बस घेतली असून महाविद्यालयात जाण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी हे शौचालय तोडण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेच्या सभागृहात ही शौचालये पाडण्याचा प्रस्ताव बहुमताने नामंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आता कुणाच्या आदेशाने हे पाडकाम करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाडायचे होते तर दुरुस्ती का केली? शौचालये तोडण्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केले का? –

चार-पाच दिवसांपूर्वी शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली होती. ते पाडायचे होते तर दुरुस्ती का केली? शौचालये तोडण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले का? कुणाच्या फायद्यासाठी ते तोडण्यात आले, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे. पूर्वसूचना न देता ही शौचालये जमीनदोस्त केल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे.