अमरावती: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना काल फटकारले. त्यांच्या विधानाबद्दल न्यायालयाने त्यांचा कठोर शब्दांत समाचार घेतला. स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नये. जर असे विधान पुन्हा केले गेले तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बजावले. त्यावर आता भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावतीत पत्रकारांशी बोलताना डॉ. अनिल बोंडे म्हणाले, राहुल गांधी जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलले तर सोनिया गांधी यांनी त्यांच्या जिभेला चटके द्यावे, म्हणजे मुलगा असे विचित्र बोलणार नाही, असे आपण म्हटले होते. सोनिया गांधी यांनी ते काम केले नाही, पण आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ते काम केले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे, आपण कुठे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलण्याची तुमची पातळी नाही. मराठीत त्याला म्हणतात लायकी नाही. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी १४ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. हालअपेष्टा सहन केल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीकारकांचे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे योगदान होते. म्हणून कोणत्याही स्वातंत्र्ययोद्ध्याविषयी इतके उथळपणे बोलू नये, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे खऱ्या अर्थाने कान टोचले आहेत. मी तर म्हणेन सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला, जो मला अपेक्षित होता.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, आता चटका बसल्यानंतर निश्चितपणे राहुल गांधी आणि त्यांचे चमचे धडा घेतील. राहुल गांधी बोलल्यानंतर नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ किंवा यशोमती ठाकूर त्यांनाही तोंड फुटते. तेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलायला लागतात. या सर्वांना ती चपराक आहे. सगळ्यांना ते चटके आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे.
डॉ. बोंडे म्हणाले, पहलगामची घटना घडल्यानंतर हे लोक पाकिस्तानचा निषेध करण्याऐवजी, दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी यात राजकारण शोधतात. संजय राऊत तर वेड्यासारखे बोलतात. शरद पवार यांनी जी संदिग्धता व्यक्त केली, त्याविषयी लोकांमध्ये चीड आहे. धर्म विचारला की नाही, हे माहिती नाही, असे शरद पवार म्हणतात. पण त्यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांचे वक्तव्य ऐकलेले नाहीत, हे दुर्देवी आहे. शरद पवार हे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवत नसतील, तर मग कठीण आहे.