वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांपेक्षा आप्तच गाजत आहेत. आघाडीचे अमर काळे यांच्या मामाच्या हातात असणारी सर्व सूत्रे चर्चेत आहेत. पण भाजप उमेदवार रामदास तडस यांना गृहकलह भेडसावत आहे. पुत्र पंकज व विभक्त सून पूजा यांच्यातील सांसारिक कलह चव्हाट्यावर आला आहे. यावरून नागपूरस्थित भाजप नेत्यांनी रामदास तडस यांना हे एकदाचे थांबवा, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

रामदास तडस यांची सून पूजा हिची बाजू शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मांडली. भाजपवाले असे आहेत, अशी टीका त्यांनी केली. पूजाचा मुद्दा यापेक्षा भाजप कसा, यावर त्यांनी टीका केली. ही बाब भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

हेही वाचा >>>लोकसभा ठरतेय प्रमुख उमेदवारांची अग्निपरीक्षा! आजी, भावी व माजी आमदारांसाठी विधानसभेची रंगीत तालीम!

सर्वप्रथम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी सूचित केले की, ही बाब मुलगा व सून यांच्या वादाचा विषय आहे. हे समजावून सांगा. तुमचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, हे पटले पाहिजे. मुलगा व सून यांनी त्यांचे पाहावे, असे सांगण्यात आले.

हे मान्य करीत रामदास तडस म्हणाले की, ही बाब खरी आहे. पण अन्य वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, असे ते म्हणाले. दिल्लीस्थित नेत्याने विचारणा केल्याची बाब तडस यांनी फेटाळून लावली. हे प्रकरण निवडणुकीपूर्वीच थांबवावे म्हणून उमेदवार तडस तसेच पक्ष नेत्यांना नागपूरस्थित नेत्यांनी सूचित केल्याचे आता बोलले जात आहे.