उद्धव ठाकरे शिवसेना व त्यांचे मशाल चिन्ह हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कुबड्यावर आहे. त्यांंनी हिंदुत्वाचा विचार सोडला असून मुख्यमंत्रीपदासाठी संपूर्ण पक्षाचे, कार्यकर्त्यांचे नुकसान केले. आता त्यांना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे, मात्र उद्धव ठाकरेंची मशाल कधी पेटणारच नाही, कारण ती हिंदुत्वाच्या नव्हे तर पंजाच्या हाती आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पुढे बोलताना ते म्हणाले, सध्याचे शिंदे – फडणवीस सरकार हे विकासाला चालना देणारे आहे. त्यामुळे अनेक मोठे नेते भाजपात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. उद्याही निवडणूक झाली तरी भाजप सज्ज आहे. २०२४ मध्ये भाजपा व बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती कायम राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यात दोनशेवर विधानसभा तर ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याची तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे विकासात अडथळे येणार नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना बळकटीकरणासाठी राज्यात दौरे करीत आहे. प्रत्येक केंद्रावर नवीन २५ कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात येईल. एका केंद्रावर ५० युवा वॉरिअर्स राहणार आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : काँग्रेसला सद्यस्थितीतून बाहेर काढण्यासाठी डॉ. शशी थरूर एकमेव पर्याय – डॉ. आशीष देशमुख

ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण बहाल केल्यामुळे समाजातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार भाजपमध्ये येताना दिसत आहे. महिला सक्षमीकरणाच्या योजनाही तयार करतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ तास काम करीत आहेत. दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे वेगाने काम करीत असल्याने गेल्या अडीच वर्षाचा भंडारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
२०२४ मध्ये केंद्रातील सरकार व आताच्या सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवून नगर पालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा जिंकणार असल्याचे ते म्हणाले. एक कार्यकर्ता २० घरापर्यंत पोहोचून राज्य सरकारच्या योजना, आरोग्य सुविधा पोहोचल्या की नाही, यावर लक्ष ठेवणार आहे. यासाठी पालकत्व योजना तयार केली आहे. याशिवाय पाच कोटींवर जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा लाभ मिळाला. त्यासाठी लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी असे एक पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत १५ लाख तर २०२४ पर्यंत दोन कोटी पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. आंतराष्‍ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कॉंग्रेसच्या काळात व आजच्या काळात तीन पटींचा फरक आहे. १० वर्षांपूर्वीच्या दराची तुलना आज करू शकत नाही. आमच्या सरकारने यात पाच ते सात रुपये कमी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वीच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दरावर देशातील पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर ठरतील, असे करून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. तरीही याबाबत जनतेच्या भावना निश्चितच सरकारला कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील तीन व नागपूर ग्रामीणच्या सहा, अशा एकूण नऊ विधानसभा मतदार संघावर स्वतः लक्ष देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. भंडारा जिल्ह्याच्या विकासाबाबतही येत्या काळात मोठे परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>अमरावती : कष्टकऱ्याच्या कन्येची गगनभरारी, युपीएससीत कमावले यश

पटोलेंना ‘लम्पी’ आजार!
नाना पटोले यांना लम्पी आजार झाला आहे. त्यांचे त्यांच्यावरील नियंत्रण सुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली की प्रसिद्धी मिळते तसेच राहुल गांधी यांना खुश करता येते, त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. आता तर त्यांना त्यांच्याच मतदार संघात पराभवाची भीती वाटत आहे. गेल्या अडीच वर्षात ते भंडारा जिल्ह्यासाठी काहीही करू शकले नाही. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसची अधोगती झाली. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे बावनकुळे म्हणाले. वीर सावरकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वार बोलण्याची त्यांची लायकी नाही, असेही त्यांनी सांगितले.