यवतमाळ: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. रुग्णांची रक्ताअभावी हेळसांड होवू नये या उदात्त हेतून महाराष्ट्र दिनी वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून रखरखत्या उन्हात शिवसेनेने सर्वसामान्यांसोबत रक्ताचे नाते जपले, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानाहून पालकमंत्री संजय राठोड बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, जीवनदादा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर, अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, रक्त्तपेढी प्रमुख विकास येडशीकर आदी उपस्थित होते.

उन्हाळ्यात रक्तदाते कमी होत असल्याने दरवर्षी रक्तपेढीत रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे पालकमंत्री संजय राठोड हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्यापासून दरवर्षी १ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. संजय राठोड हे मंत्री झाल्यानंतरही शिवसेनेने ही परंपरा कायम राखली.

शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या पुढाकाराने दरवर्षी रक्तदात्यांची संख्या वाढत असून गरजू रूग्णांना त्याचा लाभ होतो, ही समाधानाची बाब असल्याचे यावेळी राठोड म्हणाले. या शिबिरात जिल्हाभरातून आलेल्या शिवसैनिकांसह नागरिक व युवकांनी सहभागी होत रक्तदान केले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

दिवसभरात ४०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला. रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व विशेष भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. रूग्णसेवक विकास क्षीरसागर यांच्या नियोजनात झालेल्या या रक्तदान शिबिरासाठी शिवसेनेच्या रूग्णसेवकांसह रक्तपेढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या शिबिरात शिवसेना तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिव्यांग साहेबरावांनी दिली प्रेरणा

शिवसेनेच्या वतीने आयोजित प्रत्येक रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान करणारे दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथील साहेबराव हरसिंग पवार व त्यांच्या पत्नी विमल पवार यांनी रक्तदान करून उपस्थितांना प्रेरणा दिली. साहेबराव हे जन्मत: पोलिओग्रस्त असून त्यांना एक हात नाही. तरीही सामाजिक कार्यात ते सतत सक्रिय असतात. शिवसेना नेते संजय राठोड यांच्या प्ररेणतून दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयातील शिबिरात सहभागी होवून रक्तदान करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.