गडचिरोली : मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

गणपूर रै व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये-जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या.

हेही वाचा…गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी तिचे प्रेत आढळले. ते पाण्याबाहेर काढले असून उर्वरित पाच महिलांना शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

Story img Loader