वर्धा : देशात सर्वात छोटा म्हणून नोंद असलेला बोर व्याघ्र प्रकल्प उत्पन्नात मात्र अव्वल ठरला आहे. देशात सर्वात छोटा पण विमानतळापासून सर्वात जवळचा म्हणून हा प्रकल्प वैशिष्ट्य राखून आहे.
जैवविविधतेने नटलेल्या बोर प्रकल्पाने ऑक्टोंबर २०२२ ते मे २०२३ या सात महिन्यात वीस लाख रूपयाचे उत्पन्न प्राप्त केले आहे. या कालावधीत १० हजार ३४६ वन्यप्रेमी पर्यटकांनी प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ‘कॅटरीना’ ही वाघीन व बछड्यांसह नऊ वाघ आहे. तसेच ३५ बिबट हजेरी लावून आहेत. अस्वल, काळवीट, सांबर, हरीण, कोल्हे व अन्य तृण तसेच मांसाहारी प्राण्यांचा निवास आहे. २४५ प्रजातीच्या विविध पक्ष्यांचा या ठिकाणी निवास असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर : आता काय बोलावं? ‘डागा’मध्ये महावितरणसोबत बैठकीदरम्यानही वीज खंडित
पर्यावरण दिनी प्रकल्पातील कारई कुटी परिसरात फळवृक्षांचे रोपटे लावून प्रकल्पात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, क्षेत्रसाहय्क माेरे यांनी वृक्षारोपण केले. हा प्रकल्प देशात सर्वात लहान असला तरी प्राणी, पक्षी, फुलपाखरांच्या विविध प्रजातींनी समृध्द तसेच वैविध्यपूर्ण वृक्षराजी, जलस्त्रोत व टेकड्यांमुळे निसर्गसंपन्न असल्याचे इंगळे म्हणाले.