अमरावती : विवाहित प्रियकराने लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चांदुर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि नंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला. अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा छडा लावत आरोपी शुभम विठठलराव हटवार (वय २८, रा. डांगरीपुरा, चांदुर रेल्वे) आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.

चांदुर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ ऑक्टोबर रोजी एका २६ वर्षीय महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत महिला (फिर्यादीची बहीण) नवऱ्यासोबत पटत नसल्याने फिर्यादीच्या घरी राहत होती. ती सकाळी घरात दिसली नाही. शोध घेत असताना, ती रेल्वे रुळावर अपघातात मरण पावल्याची माहिती मिळाली.

वैद्यकीय अहवालाने उलगडला खुनाचा प्रकार

हा मृत्यू रेल्वे अपघातामुळे झाल्याचा प्राथमिक संशय होता. मात्र, शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी मृतदेहाच्या गळ्यावर गळा आवळल्यासारखे व्रण असल्याचा अभिप्राय दिला. यामुळे अपघाताचा संशय दूर होऊन खुनाचा संशय बळावला.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने तपासाला गती

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व बाबी तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर आणि त्यांच्या पथकाने चांदुर रेल्वे येथे तपास सुरू केला. चौकशीतून मृत महिलेचे गावातील शुभम हटवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

शुभमची कबुली आणि हत्येचे कारण

पोलिसांनी शुभम हटवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, तांत्रिक बाबींचा अभ्यास करून प्रश्न विचारल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, मृत महिलेचे आणि त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, ती शुभमला वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. ती त्याला पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर, असेही म्हणत होती. या त्रासाला कंटाळून शुभमने हत्येचा कट रचला.

पत्नीच्या मदतीने घरातच खून

शुभमने आपल्या पत्नीला या कटाची माहिती दिली. योजनेनुसार त्याने प्रेयसीला रात्री घरी बोलावले. पत्नीच्या मदतीने त्याने घरातील दोरीने प्रेयसीचा गळा आवळला आणि तिचा खून केला. नंतर दोघांनी मृतदेह एका पोत्यात बांधला. मोपेडवर मध्यभागी तो ठेवून रेल्वे पुलाखाली नेला आणि नंतर रेल्वे रूळावर फेकून दिला, जेणेकरून तो अपघातासारखा दिसावा.