लोकसत्ता टीम

नागपूर: उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील १ हजार कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठक घेत आढावा घेतला.

मेडिकल महाविद्यालयात झालेल्या बैठकीला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मेयोचे अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे, आयुर्वेदचे अधिष्ठाता डॉ. सुभाष राऊत यांच्यासह इतरही काही निवडक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मेडिकलमध्ये काही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तर काही प्रस्तावित आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण करायचे आहे. तर प्रस्तावित नवीन कॅन्सर रुग्णालय, विविध वसतिगृह, पेईंग वार्ड, निवासी डॉक्टरांसाठी रॅम्प आणि इतरही ५१८ कोटींच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

आणखी वाचा-नागपूर : न्यायालयात वकिलांमध्ये ‘फ्री स्टाईल’, कनिष्ठाने वरिष्ठाच्या डोक्यात घातली खुर्ची; कारण काय, वाचा..

मेडिकलमधील या सर्व प्रकल्पांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मेडिकलमधील बऱ्याच कामाला लवकरच सुरूवात होणार असून त्याचे भूमिपूजनही लवकरच करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. मेयो रुग्णालयातीलही सुमारे २५० कोटींचे प्रकल्प, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सुमारे ३०० कोटींच्या प्रकल्पांबाबतही विचार विमर्ष करण्यात आला. आयुर्वेद महाविद्यालयातील एका वसतिगृहाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वसतिगृहाच्या लोकार्पणाबाबतही चर्चा झाली.

मेडिकलमध्ये १०७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

मेडिकल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णालयासह इतरही वेगवेगळ्या १०७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांचा भूमिपूजन कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ ते १५ ऑगस्टला करण्याचे शासनाकडून संकेत आहेत. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करून तातडीने या कामांना वेग देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्याची माहिती आहे.