पुढील वर्षी भारतात आयोजित जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेची एक बैठक नागपुरात मार्च २०२३ मध्ये होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर उपराजधानी नागपूरची प्रतिमानिर्मिती (ब्रॅन्डिंग) करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. परिषदेच्या नागपुरातील बैठकीच्या संदर्भात गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यात पूर्वतयारीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा- नागपूर: निवृत्ती वेतनधारकांना आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र

जी-२० राष्ट्रसमूहाची आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद पुढील वर्षी भारतात होणार आहे. यानिमित्ताने भारतात प्रमुख शहरांत परिषदेच्या विविध गटांच्या बैठका होणार आहेत. त्यात मुंबई, पुण्यासह नागपूर येथेही बैठक नियोजित आहे. त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी शहरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागपुरात २१ आणि २२ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रसमूहातील संशोधन आणि नाविन्यपूर्णता गटाचे प्रतिनिधी प्रामुख्याने येणार आहेत. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर उपराजधानीची आकर्षक प्रतिमानिर्मिती (ब्रॅन्डिंग) करण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करणार आहेत. यात शहरातील प्रमुख महत्त्वाच्या स्थळांचे सौंदर्यीकरण करण्याचा समावेश आहे. महापालिका, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास, विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा विविध संस्था त्यासाठी नियोजन करीत आहेत. नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या प्राथमिक नियोजनाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी सर्व विभागांना आवश्यक सूचना केल्या.

हेही वाचा- नागपूर:डाव्या ‘अभाविप’विरुद्ध अनेक उजव्या संघटना मैदानात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, महामेट्रोचे सरव्यवस्थापक संदीप बापट, उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागूल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर आदींसह विविध यंत्रणाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.