यवतमाळ : जिल्ह्यात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी तब्बल दोन हजार ५०७ केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी भेटी देवून मतदार यादीतील दुरुस्त्या आणि आधार लिंक करणार आहेत. या सोबतच नवमतदारांची नोंदणी देखील बीएलओ ॲपद्वारे केली जाणार आहे.
पुनरिक्षण पूर्व उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटी, मतदार यादीचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, विद्यमान यादीतील आणि मतदान ओळखपत्रातील त्रुट्या दुर करणे, यादीत मतदारांचे छायाचित्र नसल्यास प्राप्त करून घेणे, छायाचित्र अस्पष्ट असल्यास बदलून घेणे, दुबार किंवा स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे वगळणे आदी कामे हे बीएलओ घरोघरी भेट देऊन करणार आहेत. या कार्यक्रमानुसार १७ ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदारांना काही दावे व हरकती असल्यास ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहे.
हेही वाचा >>>सतर्कतेचा इशारा! अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे दरवाजे दुपारी उघडणार
हेही वाचा >>>गडचिरोली : ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरणात अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात ? जिल्हा हिवताप कार्यालयातील घटना
या कालावाधीत दोन विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. मतदार केंद्र स्तरावर होणाऱ्या या विशेष मोहिमेत नवमतदारांना आपली नावे नोंदविता येईल. सोबतच मतदारांना आपल्या मतदार नोंदीत काही बदल करावयाचे असल्यास करता येणार आहे. तसेच दिव्यांग, तृतीयपंथी आणि महिला मतदारांच्या नोंदणीवरही भर दिला जाणार आहे. २६ डिसेंबरपर्यंत दाखल दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नवमतदारांनी या मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी होवू आपली नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करुन घेत मतदानाचा हक्क मिळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.