नागपूर : ब्रिटीश राजवटीत इंग्रजांनी नागपूर म्हणजे विदर्भातील कापसाचा मोठा फायदा घेतला. येथे उत्पादन होणारा कापूस कच्च्या स्वरूपात इंग्लंडला पाठवला जात असे, जिथे त्यापासून वस्त्रे तयार केली जात असत. यामुळे नागपूरला ‘कापसाचे केंद्र’ म्हणून विशेष ओळख मिळाली. कापसाच्या व्यापारामुळे नागपूरची आर्थिक उन्नती झाली असली तरी, इंग्लडच्या पंतप्रधानांनी आजवर नागपूरला कधीही भेट दिली नाही.
ब्रिटीश काळात तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इंग्लडच्या कोणत्याही पंतप्रधानाने महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला भेट दिल्याची नोंद नाही. नागपूरचे कापसासाठीचे महत्त्व आणि त्याचा व्यापारी इतिहास आहे. ब्रिटीश कालखंडात नागपूर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले. प्रामुख्याने कापड उद्योग आणि कापूस उत्पादनाच्या जोरावर नागपूरने औद्योगिक वसाहतींचा विकास पाहिला. इंग्रजांनी येथे रेल्वे जाळे उभारले, परिणामी नागपूर हे व्यापारी दृष्टिकोनातून मध्यवर्ती स्थान बनले.
१८५३ मध्ये भारतात प्रथम रेल्वे सुरू झाल्यानंतर नागपूर हे रेल्वेच्या माध्यमातून मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडले गेले. या सुविधेमुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस बाजार विकसित झाला. विदर्भातील सुपीक काळी माती कापूस उत्पादनासाठी अनुकूल असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जात असे. इंग्रजांनी याचा फायदा घेत कच्चा माल म्हणजे कापूस इंग्लंडला पाठवून तेथे वस्त्रे तयार केली जात असत. त्यामुळे नागपूर हे ‘कापसाचे केंद्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
ब्रिटिश सरकारने औद्योगिक वसाहती निर्माण करण्यावर भर दिला. १९०० च्या दशकात नागपूर येथे काही कापड गिरण्या सुरू झाल्या, जसे की एम्प्रेस मिल्स. ही गिरणी टाटा उद्योग समूहाने स्थापली होती आणि ती त्या काळात विदर्भातील सर्वात मोठी गिरणी मानली जात होती. या गिरण्यांमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि नागपूरमध्ये कामगार वर्गाचा विकास झाला. औद्योगिकीकरणामुळे नागपूर शहरात नागरीकरणासही चालना मिळाली.
नागपूरचे हवामान, स्थानिक श्रमिकांची उपलब्धता आणि रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतुकीची सुविधा या गोष्टींमुळे येथे उद्योगधंदे फोफावले. इंग्रजांच्या धोरणामुळे जरी स्थानिक उद्योगांवर मर्यादा आल्या, तरी नागपूरने कापड उद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता येथील कापड उद्योग लयास गेला आहे. पण आजही नागपूरचा इतिहास पाहता, ब्रिटिश कालीन औद्योगिक वारसा व कापड उद्योगातील योगदान लक्षवेधी ठरते. एम्प्रेस मिल्सचे अवशेष, जुन्या गिरण्या, आणि कापूस व्यापाऱ्यांचे वसलेले वाडे हे त्या वैभवशाली औद्योगिक युगाची साक्ष देतात.
नागपूरच्या कापसापासून तयार होणाऱ्या वस्त्रांची मागणी मोठ्या प्रमाणात होती, ज्यामुळे येथे कापसाच्या उत्पादनात आणि व्यापारात वाढ झाली. मात्र, या आर्थिक महत्त्वानंतरही इंग्लंडच्या कोणत्याही पंतप्रधानाने ब्रिटीश काळात किंवा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला भेट दिली नाही.