वर्धा : शासकीय नोकरीत संधी मिळाली की आयुष्याचे चीज झाल्याची भावना सार्वत्रिक म्हणावी अशी. त्यामुळे या सेवेवर पाणी सोडण्यास कोणीच तयार होणार नाही. त्यातही बहिणीसाठी तर भाऊ मागे येईल असे मुळीच दिसणार नाही. अनुकंपातत्ववर नोकरी देण्याची बाब असते तेव्हा घरातील मुलाचाच विचार होतो. घरचे पण त्याचेच नाव पुढे करतात. मात्र या घटनेत चक्क भावाने बहिणीचे नाव पुढे करीत वात्सल्य दाखविले.
या घटनेतील मनिषा कुडमेथे यांच्या आई जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होत्या. सेवेत असतानाच २००७ साली त्यांचे निधन झाले. अनुकंपा निकषावर नोकरी मिळावी म्हणून त्यांची मुलगी मनिषा हिने अर्ज देऊन ठेवला होता. तिच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले होते. म्हणून मग आईपण गेल्यावर कुटुंबात आजी, व दोघे बहीणभाऊच होते. दोघेही लहान म्हणून अनुकंपा नौकरी मिळण्यास पात्र ठरत नव्हते.पण घरी आईची पेन्शन येत होती. तुटपुंजी पेन्शन व आजी शेतात राबायची. त्यावर या कुटुंबाचे कसेबसे चालत होते. भाऊ पण मिळेल ती कामे करीत हातभार लावायचा. परिणामी त्याचे शिक्षण मागे पडले. बहीण खर्च भागवून पदवीप्राप्त झाली. भाऊ बहीण दोघेही सज्ञान. म्हणून दोघेही नौकरीस पात्र. आईच्या जागेवर कोणास घ्यायचे असा प्रश्न. पण भावाने म्हटले मी नाही, तर ताईला नोकरी द्या. भावाने परवानगी दिली आणि मनिषाचा शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
२०१६ साली मनिषा सज्ञान झाली आणि तिने अर्ज दिला होताच. पण जागा निघाल्या नव्हत्या. दरम्यान राज्य शासनाने दीडशे दिवसाच्या विशेष मोहिमेत अनुकंपातत्ववर प्रतिक्षा यादीत असलेल्या पात्र उमेदवारांना नोकरी देण्याचे धोरण जाहीर केले. परिणामी अनेक वर्षांपासून या जागांसाठी प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. मनिषा त्यापैकीच एक. याच धोरणात मनिषा कुडमेथे यांना हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे तलाठी या पदासाठी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आता हलाखीच्या स्थितीस पूर्णविराम मिळेल, अशी भावना त्या व्यक्त करतात. आजी व भाऊ यांनी प्रोत्साहन दिले आणि मी शिकू शकले. आज नोकरी पण मिळाली. जिल्हाधिकारी वान्मथी सी. व शासनाचे आभारी आहे, अशी भावना कुळमेथे मांडतात. भावाने बहिणीस घातलेली ही ओवाळणी जन्माची ठेव ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते.