लोकसत्ता टीम

नागपूर : बनावट ‘ऑनलाईन गेमींग ॲप’ बनवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक करणारा बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैन हा नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला की त्याला पळवून लावण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या डोळ्यासमोर चोवीस तास असलेला बुकी सोंटू जैन पळून गेल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘ऑनलाईन गेम’मध्ये पैसे लावल्यास दिवसाला लाखोंचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक सोंटू करीत होता. गोंदियातील सोंटू जैनने नागपुरातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पळून गेला होता. सोंटूच्या घरातून १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली. तसेच जवळपास १०० कोटींची अन्य मालमत्ता जप्त केली. सोंटू जैनच्या अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच त्याने उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता. यासाठी सोंटूने पाण्यासारखा पैसा वापरल्याची चर्चा आहे. जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. जामीन फेटाळला जाणार असल्याची माहिती सोंटू जैन आणि पोलिसांनाही माहिती होती. त्यामुळे सदरमधील हॉटेल ब्रीज इनमधून सोंटूने पलायन केले. एका ऑटोतून तो चौकात आला आणि तेथून पुन्हा दुसऱ्या ऑटोने तीन चौकापर्यंत गेला. त्यानंतर त्याने एक गाडी बोलावून शहरातून पळ काढला. कोट्यवधीची संपत्ती असलेल्या सोंटू जैनला ‘साम-दाम-दंड’चा वापर करीत पोलिसांच्या तावडीतून सुटायचे होते. त्यामुळे सोंटूच्या अभी आणि अटल नावाच्या मित्रांच्या मदतीने पोलिसांनी व्यवस्थितपणे ‘मॅनेज’ केल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नजर ठेवणार ‘बघिरा’;  पेंच व्याघ्रप्रकल्पात लवकरच कार्यान्वित

तावडीतून सुटलाच कसा!

सदरमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या सोंटू जैनवर पोलिसांचा चोवीस तास पहारा होता. मात्र, उच्च न्यायालयातून जामीन फेटाळताच हॉटेलसमोरील पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाले. त्याच दरम्यान सोंटू शहरातून पळून गेला. या कथेवर अनेकांचा विश्वास बसत नाही. मात्र, सोंटूच्या ‘अर्थाचे’ पाणी कुठेतरी ‘मुरत’ असल्याची चर्चा आहे.

हजारो कोटींच्या व्यवहारामुळे गडबड

सोंटू जैन हा हजारो कोटींचा मालक आहे. त्यामुळे त्याने विक्रांत अग्रवालचे ५८ कोटींऐवजी १०० कोटी परत करण्याचा प्रयत्न बहिणीच्या माध्यमातून केला होता. यापूर्वी डब्बा ट्रेडिंगच्या गुन्ह्याचा मोठा बाऊ करण्यात आला होता. मात्र, शेवटी सर्वांनी आपापला ‘वाटा’ घेऊन तपास थंडबस्त्यात ठेवला. त्याचप्रमाणे आता ‘गेमींग ॲप’ तपासाचीही अशीच स्थिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोंटू जैन न्यायालयाच्या आदेशाने अटकपूर्व जामिनावर होता. पळून जाण्याच्या दिवशीसुद्धा त्याला न्यायालयाचे संरक्षण होते. तो सदरमधील हॉटेलमध्येच मुक्कामी होता, याचीसुद्धा खात्री नाही. मात्र, लवकरच सोंटूला अटक करण्यात येईल. -अर्चित चांडक, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा.