बुलढाणा : लहान बालिकावरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे अशीच एक घृणास्पद व चीड आणणारी घटना घडली आहे. पिंपळगावराजा येथील जेमतेम साडेनऊ वर्षांच्या चिमुरडी वर एका नराधमाने अत्याचार केले. यामुळे पिंपळगाव राजा गावासह खामगाव तालुका हादरला आहे. येथील पेठ पुरा भागात बुधवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.
एका नऊ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिला गंभीर इजा पोचविल्या प्रकरणी आरोपी रेहान खान मुक्तार खान (२४, रा. पिंपळगाव राजा) याच्या विरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच मोठा संतप्त जमाव पोलीस ठाणे परिसरात जमा झाला. पोलिसांनी प्रक्षुब्ध जमावाची कशीबशी समजूत घातली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आणि आरोपी बद्दलची संतप्त जनभावना लक्षात घेत तातडीने तपासाची सूत्रे हलविली. पिंपळगाव राजा पोलिसांनी दोन तपास पथक आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केली. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यासह आले. पोलिसांच्या एका पथकाने आरोपी रेहान खां याला नांदुरा तालुक्यातून ताब्यात घेत पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव राजा येथील आरोपी रेहान खान याच्या पेठपुरा भागातील नऊ वर्षीय बालिका हीं किराणा दुकानावर अंडे घेण्यासाठी आली होती. आरोपीने ५० रुपयांची नोट दाखवून बालिकेला दुकानात बोलाविले. तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. सदर घडलेला प्रकार पीडितेने तिच्या नातेवाईकांना सांगितले. यावरून नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली.
काही वेळातच सदर बाब वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून सदर आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन वर सातशे ते आठशे लोकांचा जमाव जमला होता. गुन्हा दाखल करण्यात कथित तिरंगाई होत असल्याची भावना निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून पीडितेला उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे पाठविले. नागरिकांचा रोष पाहता पोलिसांनी दोन विशेष पथके नेमून आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून अटक केली.