बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील आणि जळगाव जामोद हे तालुक्याचे गाव. तालुक्यातील गावांची संख्या आणि लोकसंख्या लक्षणीय आहे. यामुळे जळगाव तहसील मध्ये दररोज विविध कामासाठी येणाऱ्या नागरिक व विविध शासकीय योजनांचे लाभार्थी यांची संख्याही मोठी राहते. जळगाव तहसील कार्यालय सुट्टीचे दिवस वगळता वर्षभर दिवसभर लोकांनी गजबजलेले राहते. एरवी गंभीर वातावरण असलेल्या जळगाव तहसील मध्ये मात्र आज वेगळेच वातावरण होते.
तहसील कार्यालयात चक्क पत्त्यांचे डाव सुरु होते. त्यातही साधासुधा खेळ नव्हे तर सध्या राज्यभर गाजत असलेल्या आणि महायुती सरकारचे वाभाडे काढणाऱ्या रमीचा डाव रंगला होता.यामुळे येणारे जाणारे नागरिक संभ्रमात पडले, गोंधळून गेले, आश्चर्यचकीत झाले. सरकारी कचेरीत रात्री बेरात्री नव्हे तर चक्क भरदिवसा पत्त्याचा डाव रंगलेला पाहून त्यांचे चकित होणे स्वाभाविक होते. बरं खेळणारे चार पाच जन नव्हे तर शेकडो खेळाडू रमी चा ‘जंगली आनंद घेत होते. मात्र काही वेळानंतर या रमी चा उलगडा झाला. हा वरवर पाहता रमीचा खेळ असला तरी प्रत्यक्षात एक आगळे वेगळे आंदोलन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)च्या जळगाव शहर व तालुका शाखेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जळगाव बाजार समितीचे सभापती ऍड. प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वात हे रमी खेळा आंदोलन करण्यात आले. आज बुधवारी दुपारी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारला भिकारी म्हणे पर्यंत मजल गेलेले कृषीमंत्री माणिक कोकाटे यांच्या राजीनाम्या च्या मागणीसाठी हा डाव मांडण्यात आला. खेळ रंगला असताना ‘राजीनामा द्या राजीनामा द्या, कृषीमंत्री राजीनामा द्या, या कृषीमंत्र्याचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ या घोषणा देण्यात आल्या. यामुळे तहसील कार्यालय अक्षरशः दणाणले!
रमी आंदोलनात विश्वास भालेराव, प्रमोद सपकाळ, एम.डी. साबीर, ईरफान खान, शेख जावेद,एजाज देशमुख, विष्णु रोठे,हनुमंत देशमुख, सिद्धार्थ हेलोड़े,आशिष वायझोडे, दत्ता डिवरे,वामन गुड़ेकर,श्रीकृष्ण जाधव, अकील शाह, तुकाराम गटमने यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले .
कोकाटेना मुख्यमंत्र्याचे समर्थन आहे का’?
दीड एक तास रमीचा आनंद घेतल्यावर प्रसेनजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात जळगाव तहसीलदार यांच्या समोर आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. राज्याचा कृषीमंत्री सभागृहाचे पावित्र्य भंग करीत जंगली रमी चा आनंद घेतो. त्यामुळे त्यांच्या राजीनामा्यासाठी आम्ही हे आंदोलन केले असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी उपस्थित प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत बोलताना पाटील म्हणाले की, सरकार कोणतीच कारवाई करीत नाही, याचा अर्थ कोकाटेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे समर्थन आहे का? असा सवाल त्यांनी केला.कोणतेही स्पष्टीकरण न मागता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणीही पाटील यांनी केली.