बुलढाणा : लहान मोठ्या अपघातानी गाजत असलेला हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती महामार्ग अधूनमधून गुन्हेगारीच्या घटनांनी देखील गाजत आहे. विविध कारणामुळे अपराधीसाठी हा मार्ग ‘आवडीचा’ ठरला आहे.
पोलिसांच्या अश्याच कारवाईत उत्तरप्रदेश मधील अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्या जवळून देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश राज्यातील दरोडा, लूटमार, टोळीयुद्ध ( गँग वॉर )या सारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारास लोणार तालुक्यातील बिबी पोलिसांच्या पथकाने सतर्कतेने जेरबंद केले. समृद्धी महामार्गावर ही थरारक कारवाई करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा हद्दीत नियमित २४ तास पेट्रोलिंग करण्यात येत आहे. त्यानुसार बिबी पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार तसेच वाहतूक शाखा बुलढाणाचे कर्मचारी गस्त घालत असतांना समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई लेनवर चॅनल क्रमांक ३०३-५ नजिकच्या खळेगाव शिवार ( तालुका लोणार) एक आयशर वाहनाचा चालक हा संशयास्पदरितीने थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या पथकाने घटनास्थळी उभ्या असलेल्या आयशर वाहन (एमएच ४० सीडी ०७३५) चालक याची पोलिसांनी कसून चौकशी केली.
प्रारंभी चालकाने त्याचे नाव लपवून खोटे नाव सांगितले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने त्याची कसून चौकशी केली असता, त्याचे नाव अदिल उर्फ मेराज मो मुस्तकीम (रा. सोभीपूर, जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश ) निष्पन्न झाले. आरोपी इसमाच्या अंगझडतीमध्ये त्याचे खिशात दोन जीवंत काडतुसे मिळून आली. त्यामुळे संशय बळवल्याने त्याच्या बॅगची तपासणी केली असता, त्यात एक सिल्वर रंगाची देशी बनावटीची पिस्टल (देशी कट्टा) व दोन जीवंत काडतुसे मिळून आली. आरोपीकडून पथकाने एक देशी कट्टा, चार जीवंत काडतूस, मोबाईल, वाहन व रोख रक्कम जप्त केली. आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशातील ‘हिस्ट्री शीटर’!
सदर आरोपीची अधिक चौकशी व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करण्यात आली असता नमूद आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश राज्यात दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, लूटपाट, गैंग कायदा कलम, तसेच शस्त्र कायदा विस्फोटक पदार्थ बाळगण्याचे ७ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. आरोपी हा मान्थता पोलीस स्टेशन जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्री सीटर गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सराईत आरोपी हा आपली ओळख लपून नागपूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कामावर लागला हत्यारासह महाराष्ट्रात मिळून आल्याने बुलढाणा पोलिसांच्या पेट्रोलिंग व सतर्कतेमुळे अनुचित प्रकार होण्यापासून रोखले गेला आहे. आरोपीच्या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत कारागृहात परवानगी झाली असून, आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंद, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस अंमलदार अरुण सानप, रवींद्र बोरे, संदीप शिंदे, अर्जुन सांगळे, राजू आडवे, वाहतूक शाखा अमलदार शिवानंद मुंडे, श्रीकृष्ण दूनगु यांनी केली आहे.