बुलढाणा: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने भरधाव वेगात दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारी युवक ठार झाला. बसची धडक इतकी जोराची होती की, दुचाकी स्वार अक्षरशः हवेत भिरकावला गेल्याने रस्त्यावर आदळून जागीच गत प्राण झाला.
सोमवारी, १२ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. घटना स्थळी उपस्थितांच्या देखत युवक दगावला. चिखली-खामगाव मार्गावरील सोमठाणा फाट्यावर ही दुर्घटना घडली.
शंकर भोपळे (४० वर्षे,राहणार तेल्हारा ,तालुका चिखली,जिल्हा बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.शंकर भोपळे हे आपल्या दुचाकीवरून चिखली येथून आपल्या मूळ गावी तेल्हारा कडे जात होते. दरम्यान, सोमठाणा फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या (एमएच ०८ एस ८७८६ क्रमांकाच्या) एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोपळे रस्त्यावर अक्षरशः फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.
सलग दुसऱ्या दिवशी अपघात
दरम्यान चिखली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघाताची नोंद झाली. रविवारी, संध्याकाळी उशिरा एका अॅपेचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून डिव्हायडरला धडक दिली. त्यात अॅपेचे एक्सल तुटून झालेल्या दुर्दैवी अपघातात प्रवासी जागीच ठार झाला होता. चिखली-जालना राज्य महा मार्गावरील हॉटेल नीलमजवळ हा अपघात घडला होता.
संजय दिलीप गायकवाड (वय ३० वर्ष, रा. नायगाव खुर्द तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे आरोपी चालकाचे नाव आहे. आपल्या अॅपे (एमएच २८, टी, ४७३) एक प्रवासी घेऊन नायगाव खुर्द येथे जात असताना चिखली ते जालना रोडवरील हॉटेल नीलमसमोर चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने सदर अपे डिवायडरला धडकली.अॅपेतील प्रवासी प्रकाश बबन झोपाटे (वय, ३० वर्ष, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यु झाला. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मैंद, पोलीस जमादार विजय गीते यांनी घटनास्थळावर दाखल होत आरोपी चालक संजय दिलीप गायकवाड यास ताब्यात घेतले होते. काल रात्री उशिरा त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.