बुलढाणा : बुलढाणा नजीकच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली. यामुळे त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले. त्यापैकी आठ जणींना सुट्टी देण्यात आली असून पाच विद्यार्थिनींवर सध्या उपचार सुरु आहेत.
रात्री कढी भात जेवल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा झाला त्रास सुरु झाला. यामुळे खळबळ उडाली. काल शुक्रवारी रात्री उशिरा यातील आठ जणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित पाच विद्यार्थिनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतरही अन्न औषध प्रशासनाने कारवाई न केल्याने आमदार संजय गायकवाड संतप्त झाले. निवडक प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्यांनी नेहमीच्या आक्रमक पद्धतीने प्रतिक्रिया दिली. विषबाधेची घटना घडली असतांना देखील अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना कल्पनाच नसल्याचे माध्यम प्रतिनिधींनी सांगितल्यावर ते म्हणाले, मी या यासंदर्भात थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय आदिवासी विकास खात्याच्या अधिकाऱ्याशी बोलणार आहे.
गावात शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आदिवासी आश्रम शाळा काढण्यात आल्या. मात्र असे प्रकार होत असतील तर या शाळांचा काय फायदा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण ‘काही कारवाई’ करणार का? असा प्रश्न केल्यावर आमदारानी सांगितले की मी काही केले तर तुम्हीच मी कायदा हाती घेतला म्हणून सांगाल. मी कायदा हातात का घेतो ते आता या प्रकरणावरून तुम्हाला समजले असेलच, असा मार्मिक टोला त्यांनी लगावला. मात्र अशा लोकांना असेच सरळ करावे लागते अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली.