|| मंगेश राऊत

शाळा परिसरात तंबाखूविरहित सिगारेटची सर्रास विक्री

दिवसेंदिवस शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन व नशाखोरीचे प्रमाण वाढत आहे. आता बाजारात ‘कॅप्टन गोगो’ नावाची तंबाखूविरहित सिगारेट सहज उपलब्ध होत असून त्याची शाळा परिसरातील पानठेले व  इतर दुकानात विक्री होत असल्याची माहिती हाती आली आहे.

शाळकरी मुलांमधील व्यसनाधीनता ही पालकाची मोठी समस्या झाली आहे. दोन वर्षांपूर्वी सिव्हिल लाईन्स परिसरातील एका नामांकित शाळेत काही विद्यार्थी ई-सिगारेट पिताना सापडले होते. असे अनेक प्रकार समोर येतात व शाळेची बदनामी होऊ नये म्हणून ते दडपले जातात. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईमध्ये अनेकदा अल्पवयीन मुले सापडतात.  गांजा, मेफ्रेडोन आदी स्वरूपाचे अंमली पदार्थाचे सेवन मुले करतात. याला पर्याय म्हणून बाजारात ई-हुक्का उपलब्ध झाला आहे. काही दिवसांपूर्वी तंबाखूविरहित ‘कॅप्टन गोगो’ ही सिगारेट बाजारात आली. अल्पावधीतच विद्यार्थ्यांकडून त्याची मागणी वाढू लागली.

रामदासपेठ, सिव्हिल लाईन्ससह शहरातील अनेक शाळांच्या परिसरात पानठेल्यांवर ही सिगारेट उपलब्ध आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील एका  महाविद्यालयासमोर पानठेल्यावर ही सिगारेट घेण्यासाठी तरुणांची गर्दी असते. विशेष म्हणजे, ती ऑनलाईनही मागवता येते. शालेय विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ही धोक्याची घंटा असून त्वरित या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कारवाई करू

सिगारेट हा विषय अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारितील विषय आहे. पण, त्या तंबाखूविरहित सिगारेटचा वापर ब्राऊन शुगर किंवा इतर अंमली पदार्थ ओढण्यासाठी करण्यात येत असल्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (एनडीपीएस) कारवाई करण्यात येईल.    – राजेंद्र निकम, पोलीस निरीक्षक (एनडीपीएस).

‘‘कॅप्टन गोगो सिगारेटचा प्रकार नवीन आहे. त्यात काय आहे, याचा अभ्यास करण्यात येईल. शाळेच्या आवारात याची विक्री करण्यात येत असेल व आरोग्याला अपायकारक असल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. ’’     – शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (अन्न).