scorecardresearch

महानिर्मितीमध्ये चौकशी थांबवण्यासाठी कामगार संघटनेच्याच बनावट पत्राचा वापर; अभियंत्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल

काही कंत्राटी कामगारांना किमान वेतनावरील भत्ते मिळत नाही, कामगारांना वेतन पावती मिळत नाही यासारखे आणखी गंभीर आरोप असलेली तक्रार महानिर्मितीच्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली होती

crime news
कामगार संघटनेच्याच बनावट पत्राचा वापर केल्याप्रकरणी अभियंत्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

शासकीय व निमशासकीय अस्थापनांमध्ये कुणी तक्रार केल्यावर त्यावर चौकशी करून नियमानुसार कारवाई होते. महानिर्मितीच्या खापरखेडा प्रकल्पातही हेच अपेक्षित आहे. परंतु, येथे राष्ट्रीय मजदूर काँग्रेसकडून (इंटक) कंत्राटी कामगारांच्या पिळवणूकीबाबत एका कंत्राटदारविरोधात तक्रार होती. त्यानंतर ही तक्रार परत घेण्याचे संघटनेचे बनावट पत्र लावून चौकशी करण्यात आली नाही. हे प्रकरण सावनेर न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशावरून खापरखेडा पोलिसांनी एका अभियंत्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- यवतमाळ : ज्येष्ठांनी ‘सेकंड इनिंग’मध्ये केली जिवाची मुंबई! आयुष्याच्या सायंकाळी मायानगरीची सफर

विश्वास सोमकुंवर (महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता) आणि भरत पटेल (ए.बी.यू. कनस्ट्रक्शनचे ठेकेदार) असे गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, इंटकचे भीमराव बाजनघाटे हे इंटकचे महासचिव आहेत. त्यांनी खापरखेडा प्रकल्पातील काही कंत्राटी कामगारांना ए.बी.यू. कन्स्ट्रक्शनकडून हजेरी कार्ड मिळत नाही, किमान वेतनावरील भत्ते मिळत नाही, कामगारांना वेतन पावती मिळत नाही, ईपीएफ भरला जात नसल्यासह इतरही गंभीर आरोप असलेली तक्रार महानिर्मितीच्या मुख्य अभियंत्यांना करत कामगारांना न्याय देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा- भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना ‘माय मराठी’ची ॲलर्जी; मराठी दिनाच्या दिवशीच ‘मराठी’ भाषेची लख्तरे वेशीवर

या तक्रारीवर पुढे काही झाले नसल्याचे बाजनघाटे यांनी महानिर्मितीमध्ये चौकशी केली. त्यावर इंटकने तक्रार परत घेतल्याचे बनावट पत्र दिल्याने नंतर काहीच झाले नसल्याचे पुढे आले. त्यांनी माहितीच्या अधिकारातून महानिर्मितीकडून हे बनावटी पत्र मिळवले. त्यानंतर महानिर्मितीच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत माहिती देत सावनेर न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाच्या निर्णयानंतर खापरखेडा पोलिसांनी बनावट पत्र प्रकरणी महानिर्मितीचे अभियंता सोमकुवर आणि कंत्राटदार पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 13:50 IST