नागपूर : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाल्यानंतर मराठवाड्यात जातियशक्तींनी दलितांवर हल्ले चढवून मोठा हिंसाचार केला.

दलितांचे खून केले, या अत्याचारांविरोधात पहिली प्रतिक्रिया नागपुरात ४ आगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चाच्या रूपाने उमटली. या मोर्चातून परतणारे नागरिकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन, अविनाश अर्जून डोंगरे हे शहीद झाले होते, तेव्हापासून ४ आगस्ट हा शहीद दिवस पाळला जोतो. या वर्षी या घटनेला ४५ वर्षे पूर्ण झाली.

नागपुरातील दुसरा गोळीबार ६ डिसेंबर १९७९ रोजी झाला, त्यात दिलीप सूर्यभान रामटेके, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे ४ भीमसैनिक शहीद झाले. असे एकूण ९ नामांतरासाठी नागपुरात शहीद झाले. नामांतराच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटना व पुरोगामी शक्तिंना १६ वर्षे संघर्ष करावा लागला. अनेकांचे बलिदान व भीमसैनिकांच्या अविरत आंदोलनामुळे अखेर सरकारला १४ जानेवारी १९९४ रोजी नामांतरावर अंमलबजावणी करावी लागली, या इतिहासास या वेळी वक्त्यांनी उजाळा दिला.

नामांतर शहिदांना अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिनानिमित्त आज, सोमवारी ४ आगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सहयोग मित्र परिवार संस्था, उत्तर नागपूर विकास आघाडी, समता सैनिक दल व उत्तर नागपूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकावर रिपाइं नेते डी.एम.बेलेकर, भदंत नागदीपांकर, नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते अनिल वासनिक,रामभाऊ डोंगरे, रजनी वंजारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना विनम्र अभिवादन केले.

सर्वप्रथम इंदोरा चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर कार्यकर्त्यांनी रॅलीद्वारे नामांतर शहीद स्मारकावर जाऊन शहिदांना जयभीम सलामी दिली. या वेळी अभिवादन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डी.एम. बेलेकर होते. सभेत भदंन्त नागदीपांकर, अनिल वासनिक, रामभाऊ डोंगरे, भीमराव वैद्य यांनी विचार मांडले. संचालन लहानू बन्सोड यांनी केले.