नागपूर : राज्यातील शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमधील विद्यार्थी पुस्तकांविना धडे गिरवत असल्याचे चित्र आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांमध्ये बदल होणार असल्याने राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या (सीबीएसई) पुस्तकांचे प्रकाशन कमी केले आहे. त्यामुळे शाळांमध्ये ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

शाळा सुरू झाल्याने पालक वारंवार पुस्तकांसाठी विचारणा करत आहेत, मात्र पहिली ते दहावीची ६० टक्के पुस्तके उपलब्ध नाहीत. यामुळे आता नाइलाजाने काही पालक इंटरनेटवरून पुस्तके घेत आहेत. परिणामी, ४० रुपयांचे पुस्तक २ हजार रुपयांना पडत असल्याने पालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

मुलांचे पुस्तकाविना शिक्षण सुरू असल्याने पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केवळ एकाच इयत्तेची अथवा एखाद्या विषयाच्या पुस्तकाची कमतरता समजण्यासारखी आहे, मात्र पहिली ते दहावीपर्यंतच्या विविध विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा आहे. काही विक्रेते पुस्तकांचा तुटवडा असल्याचे सांगत आहेत. काही विक्रेते मात्र इतरत्र उपलब्ध असलेल्या दुकानांतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पुस्तके बोलावून देत असल्याची माहिती आहे. 

 नववी आणि दहावीच्या विज्ञान आणि गणिताची पुस्तके कमीअधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. सहावी गणित, विज्ञान तर आठवी ते दहावी इयत्तांतील समाजशास्त्र, इतिहास आणि भूगोलाची पुस्तके मात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाहीत. हीच अवस्था पाचवीपासून आठवीपर्यंतच्या हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित तसेच संस्कृत या विषयांची आहे.

छपाई न झाल्याने टंचाई..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून छपाई न झाल्याने ही स्थिती उद्भवल्याचे सीबीएसई पाठय़पुस्तकांच्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिल्ली कार्यालयाकडे याबाबतची विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. पुस्तकांच्या तुटवडय़ामुळे अनेक पालकांनी ‘एनसीईआरटी’ आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र पाठवून पुस्तके उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.