नागपूर: केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ‘ई- केवायसी’ अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजेंसीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया न केल्यास ग्राहकाची प्रति सिलेंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद होणार आहे. सध्या गॅस धारकाला संबंधित गॅस एजेंसीकडून तसे मोबाईलवर संदेश येत आहे.

ग्राहकाला (गॅस जोडणी ज्याच्या नावाने असेल) ‘ई- केवायसी’ करण्यासाठी त्याच्या एलपीजी गॅस एजेंसीच्या कार्यालयात यावे लागेल. येथे येतांना लाभार्थ्यांचा मोबाइल व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. सदर कार्यालयात ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया एजेंसीकडून केली जाईल. त्यानंतर ग्राहकाला परत जाता येईल. दरम्यान ही ई-केवायसी प्रक्रिया न केल्यास ग्राहकाचे गॅस सिलिंडर वितरण व अनुदानही बंद होऊ शकते.

हेही वाचा >>>आरटीई घोटाळा : शाहिद शरीफच्या साथीदाराच्या कार्यालयाची झडती, स्कॅनरसह बनावट कागदपत्र…

एखाद्या ई- केवायसी न केलेल्या ग्राहकासोबत असे झाल्यास तो संबंधित एजन्सीमध्ये जाऊन ही प्रक्रिया नंतरही करू शकतो. या गॅस कंपनीकडून संबंधित ग्राहकाची गॅश जोडणी पून्हा सुरू होईल. ग्राहकांनी त्यांच्या गॅस जोडणीची सुरक्षा तपासणीही करून घेणे अनिवार्य आहे. दरम्यान ई- केवायसीमुळे तुमचा मोबाइल क्रमांक बदलला आहे. तो तत्काळ अपडेट होईल, जोडणी धारकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित जोडणी दुसऱ्याच्या नावावर करता येईल. गॅस जोडणीमध्ये इतर काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करता येतील. ग्राहक सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छितात तर त्यांनी जोडणीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरूनच सिलिंडर रिफिलिंग बुकिंग करावी. बुकिंग केल्याशिवाय वितरण करणाऱ्या व्यक्तींकडून सिलिंडर घेऊ नये. त्यामुळे लाभाथ्याँच्या सबसिडीचे नुकसान होऊ शकते असे येथील पुरवठा विभागाकडून सूचित करण्यात आले.

हेही वाचा >>>ताडोबात आता नो रिव्हर्स, नो यू-टर्न; नियम मोडल्यास…

ग्राहकाच्या मोबाईलवरील संदेशात काय?

गॅस ग्राहकाला गॅस एजेंसीकडून आलेल्या संदेशात केंद्र सरकार व कंपनीच्या निर्देशानुसार सर्व गॅस ग्राहकांना ई- केवायसी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता कृपया आपले गॅस जोडणी कार्ड, आधार कार्ड (ज्यांच्या नावाने जोडणी आहे) घेऊन एजेंसीत यायचे आहे. येथे स्वत:चा अंगठा लावून औपचारिकता पूर्ण करावी. ही कारवायी पूर्ण न झाल्यास भविष्यात आपली गॅश आपूर्ती, अनुदान बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकाने सहकार्य करावे, असे संदेशात नमुद आहे.

देशात जोडण्या किती?

भारतात वर्ष २०१४ मध्ये १४ कोटी एलपीजी गॅस जोडणी होत्या. त्यावेळी गॅस जोडणी घेण्यासाठी अनेक लोकांच्या शिफारशी घ्याव्या लागत होत्या. २०१६ मध्ये केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली, त्यानंतर महिलांना सहज गॅस जोडणी मिळत आहे. आज देशात ३२ कोटींहून अधिक गॅस जोडणी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुदान किती ?

घरगुती संवर्गातील गॅस जोडणीवर सध्या केंद्र सरकार प्रति सिलेंडर ४० रुपये अनुदान दिले जाते. ही अनुदानाची राशी जोडणी असलेल्या (लाभार्थी) ग्राहकाच्या थेट बँक खात्यात वळती केली जाते. पूर्वी अनुदानाची रक्कम जास्त असली तरी कालांतराने या रकमेवर कात्री लावण्यात आली.