लोकसत्ता टीम

नागपूर : वाघांच्या हालचालींचा, त्यांच्या एकूणच वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी गेल्या काही वर्षात तरुण वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचे प्रमाण वाढले आहे. वाघाच्या स्थलांतरणची, स्थानांतरणाची माहिती यातून समोर येते. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ ही प्रक्रिया पार पाडतात. मात्र, ही लावलेली कॉलर गळल्यास समस्या देखील उद्भवू शकते.

जगप्रसिद्ध “जय” या वाघाची कॉलर दोनदा गळून पडली आणि दुसऱ्यांदा तर त्याचा ठावठिकाणा लागला नाही. तो वाघ आता इतिहास बनून राहिला आहे. याच नागझिरा अभयारण्यात आता वाघिणीची कॉलर गळाल्याने या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा-सलमानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे संवर्धन स्थानांतरण उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तरुण वाघिणीला ११ एप्रिलला सायंकाळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याच्या कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते. निसर्गमुक्त केलेल्या वाघीणीला सॅटेलाईट जीपीएस कॉलर तसेच व्हिएचएफ अन्टेनामार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रशिक्षीत चमूव्दारे वाघिणीच्या हालचालीवर २४ बाय सात सक्रियपणे सनियंत्रण सुरू होते. मात्र, १२ एप्रिलपासून मादी वाघीणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलरचे सिग्न्ल तसेच व्हिएचएफ चमूला प्राप्त सिग्नल एकाच ठिकाणी येत असल्याने दिनांक १३ एप्रिलला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हिएचएफ चमू, क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांचेकडून शोध मोहीम राबविली असता मादी वाघीणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये जमिनीवर पडलेले आढळले. शोध मोहीम राबवून एक किलोमीटर परीसरात व्हिएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांनी शोध घेतला असता कोणतीही अनुचित घटना घडल्याचे निदर्शनास आले नाही. क्षेत्रीय चमूला आढळलेले सॅटेलाईट जीपीएस कॉलर चालू स्थितीमध्ये असून सदर वाघिणीच्या हालचालीमुळे सॅटेलाईट जीपीएस कॉलर स्वतःहून काढण्यात आल्याची शक्यता असू शकते.

आणखी वाचा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ अधिकारी तसेच तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील व्हिएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून क्षेत्रीय स्तरावरून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. तसेच सपुंर्ण क्षेत्रात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरा लावून वाघीणीचे हालचालीचे संनियंत्रण करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर वाघीणीला पुन्हा सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांनी कळवले.