नागपूर: जिल्ह्यात शनिवारी सहा जानेवारीला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर सात जानेवारीला हवामान कोरडे राहण्याची आणि आठ जानेवारीला तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सहा ते आठ जानेवारीला खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता कापणी केलेला धान, तूर तसेच वेचणी केलेला कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा. धान, तूर व इतर पिकाची मळणी शक्य नसल्यास शेतमाल हा प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढे ढकलावी. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर बांधवांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी. विजेपासून संरक्षणासाठी झाडाखाली आश्रय घेणे कटाक्षाने टाळावे तसेच पशुधनाचा झाडाखाली आश्रय टाळावा. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.

हेही वाचा… नागपुरात विमानाचे ‘इमरजन्सी लॅन्डिंग’ काय घडले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, असे जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्रीय कापूस संशोधन संस्था व प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.