चंद्रपूर : शेतकऱ्यांकडून आधारभूत धान खरेदी योजनेतंर्गत खरेदी केलेले धान व गिरणीधारकांकडून प्रत्यक्षात भरडाई केल्यानंतर शासनाला पुरवठा होत असेलल्या तांदळाच्या साठ्यात तफावत आढळून आल्याने जिल्ह्यातील तांदूळ घोटाळ्याचे बिंग फुटले.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी व धान गिरणी मालकांच्या हातमिळवणीतून सुरू असलेल्या या घोटाळ्याची जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी तातडीने वस्तुनिष्ट अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांना दिले आहेत. त्यामुळे धान गिरणी मालक व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य खरेदी, पुरवठा साखळी व्यवस्थापन, साठवणुक क्षमता, अन्नधान्याचे वितरण, आदी बार्बीचा अभ्यास करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग व इतर अधिकाऱ्यांमार्फत १ जूनला कांपा (ता. नागभीड) येथील गुप्ता राईस एक्स्पोर्ट व चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रिज, या दोन गिरण्यांवर छापे टाकले.

गिरणीधारकांनी उचल केलेला धान आणि भरडाईनंतरच्या तांदूळ साठ्यात तफावत दिसून आली. यामुळे उपसचिवांनी या दोन धान गिरणीतील तांदूळ खरेदी करण्यावर निर्बंध आणले.

जिल्ह्यात या दोन गिरण्याच नव्हे, तर इतर अनेक धान गिरण्यांमधून मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याचा संशय आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्या, असे निर्देश दिले होते. मात्र, जिल्हा मार्केटिंग अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर जिल्हाधिकारी गौडा यांनी स्वत: मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांना फोन करून तांदूळ खरेदी प्रकरणाचा अहवाल तत्काळ सादर करा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असता, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आकडेवारीचा खेळ

जिल्हा मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांनी यासंदर्भात आकडेवारी दिली आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२४-२५ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या धान साठापैकी गुप्ता राईस एक्स्पोर्ट या गिरणी धारकास २१०९९.९२ क्विंटलचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या ‘बीम पोर्टल’द्वारे ‘डीओ’ देण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्षात २३०३७३.६८ क्विंटल धानाची उचल करून ७२६ क्विंटल घट वजा करता संपूर्ण ‘डीओ’ ‘बीम पोर्टल’वर ऑनलाइन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्ष उचल करण्यात आलेल्या धानाच्या ६७ टक्के प्रमाणे १३६५०.३७ क्विंटल ‘सीएमआर’ तयार होते. त्यापैकी ५२०६.६० क्विंटल धान शासकीय गोदामात जमा करण्यात आले व उर्वरित जमा करणे सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ते केवळ आकडेवारीचा खेळ खेळत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.