चंद्रपूर : तुकूम परिसरात वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला. यानंतर महापालिकेने शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. मात्र, शहराचे हृदयस्थान असलेल्या आझाद उद्यान, जयंत टॉकिज चौक या मुख्य मार्गांवर ‘सेंडे मार्केट’मुळे वाहतुकीची अक्षरश: कोंडी होत आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच ‘संडे मार्केट’चे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासकाला जाग येणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. या मार्गावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह इतर आठ ते दहा रुग्णालय आहेत. असे असतानाही महापालिकेने येथे अतिक्रमण होऊच कसे दिले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

गेल्या आठवड्यात तुकूम परिसरात झालेल्या अपघातात सानिका कुंभारे (२२) या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला, तर तिच्या मैत्रिणीला पाय गमवावा लागला. १५ ते २० दुचाकी व चारचाकी वाहने टिप्परखाली चिरडल्या गेली. या घटनेनंतर महापालिकेचे अति. आयुक्त चंदन पाटील यांनी शहरातील ताडोबा रोड, तुकूम, बंगाली कॅम्प, मूल रोड, बल्लारपूर रोड, जटपुरा द्वार, औषध बाजार, दाताळा रोड, नागपूर रोड, बसस्थानक चौक ते रेल्वे स्थानक या मार्गांवरील अतिक्रमण काढण्याचे वेळापत्रक जाहीर करून मोहिमेला सुरुवात केली. ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम स्वागतार्ह असली तरी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या महात्मा गांधी मार्गावरील आझाद उद्यान, जयंत टॉकिज येथे दर रविवारी भरणाऱ्या ‘संडे मार्केट’चे अतिक्रमण कधी काढणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला विचारला जात आहे.

‘संडे मार्केट’च्या नावावर भरणाऱ्या या बाजारात अमरावती, नागपूर येथून व्यवसायासाठी आलेल्या छोट्या दुकानदारांची संख्या अधिक आहे. प्रत्येक रविवारी स्वत:च्या वाहनाने हे छोटे दुकानदार शहरात दाखल होतात आणि मुख्य मार्गावर दुकाने थाटतात. आता तर ‘संडे मार्केट’ने हा संपूर्ण परिसर व्यापून टाकलेला आहे. जयंत टॉकीज, कस्तुरबा रोड, तसेच या भागातील सर्व रस्त्यांवर दुकाने थाटली जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सायंकाळी सहा वाजतानंतर या मार्गाने साधी दुचाकी नेता येत नाही. पायदळ जाण्यासाठीदेखील बरीच कसरत करावी लागते. या मार्गावर एक उच्च प्राथमिक शाळा आणि अनेक रुग्णालये आहेत. रविवारी येथून रुग्णवाहिका नेण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वेळा बाजारातील गर्दीमध्ये रुग्णवाहिका अडकल्या.

महापालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत!

‘संडे मार्केट’ इतरत्र हलवण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार केली जाते. मात्र महापालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून अधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आजी-माजी नगरसेवकदेखील ‘संडे मार्केट’च्या समर्थनार्थ उभे राहत असल्याने अनेकांचा नाईलाज झाला आहे. अपघात होवून एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी महापालिकेने ‘संडे मार्केट’चे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरिबांवर कारवाई, श्रीमंतांचे अतिक्रमण ‘जैसे थे’!

अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली महापालिकेच्या पथकाने शहरातील अनेक दुकाने तसेच घरांचे बांधकाम ‘जेसीबी मशीन’ने तोडून टाकले. या मोहिमेत गरिबांचेच नुकसान झाले, श्रीमंतांची अतिक्रमणे, घरे ‘जैसे थे’ आहेत. ती तोडण्याची हिंमत महापालिका प्रशासन दाखवणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.