चंद्रपूर : लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदाराला कामे मिळावी, यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियेवर अघोषित स्थगिती लादली आहे. यासाठी २० कोटींपेक्षा अधिकच्या ८१ विकासकामांच्या निविदा महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून उघडल्याच नाही, असा आरोप करीत, ही निविदा प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करा, अन्यथा महापालिकेसमोर भजन आंदोलन करू, असा इशारा सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)चे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी दिला.

चंद्रपूर महापालिकेत मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेला कोट्यवधींचा विकास निधी प्राप्त झाला. मात्र, शहरात कुठलीही विकासकामे झालेली दिसत नाहीत. पावसाळ्यापूर्वी कोट्यवधींच्या खर्चातून शहरातील दोन मुख्य रस्त्यांची कामे झाली. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.

सर्वत्र विकासकामे थंडावली असताना महापालिकेने २० कोटींच्या ८१ कामांची निविदा प्रक्रिया दोन महिन्यांपासून पूर्ण केली नाही. दोन महिन्यांपासून निविदा उघडायला महापालिका अधिकाऱ्यांना वेळच मिळाला नाही. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहे. अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. राज्य व केंद्र शासनाने महापालिकेला नगर उद्यान, दलित वस्ती तथा इतर योजनेतून कोट्यवधीचा निधी दिला, मात्र १६ मे ते २१ मे २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या निविदांवर महापालिकेने अघोषित स्थगिती आणली की काय, असा प्रश्न पडतो. कारण, महापालिकेने ८१ कामांच्या निविदा उघडल्याच नाही, असा आरोप कक्कड यांनी केला आहे.

भजन आंदोलनाचा इशारा

सध्या महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे, त्यांना चंद्रपूरवासीयांच्या समस्या दिसत नाही का?, असा प्रश्न उपस्थित करीत, रखडलेली निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा आणि विकासकामांना सुरुवात करा, अशी मागणी कक्कड यांनी केली आहे. दोन दिवसात निविदा उघडल्या नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भजन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कक्कड यांनी दिला आहे.

निविदा मागे घेण्यासाठी कंत्राटदारांवर दबाव!

काही लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावी, यासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदारांना महापालिकेतून फोन जात आहे. निविदा मागे घ्या, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असा आरोपही होत आहे. या दबावतंत्रामुळे कंत्राटदार त्रासले असल्याचे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बऱ्याच निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत. एक-दोन निविदा राहिल्या असतील, मात्र उर्वरित सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हा विषय जुनाच आहे. – विपीन पालीवाल, आयुक्त तथा प्रशासक, चंद्रपूर महापालिका.