चंद्रपूर : लहान मुले पळवणाऱ्या १० ते १२ महिलांची टोळी शहरात आल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरली आणि एकच खळबळ उडाली. या अफवेतून बालाजी वॉर्डमध्ये एका मनोरुग्ण महिलेला नागरिकांनी पकडले आणि मारहाण केली. या मारहाणीच्या चित्रफितीने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आणि मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

नेमकं घडलं काय?

शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात दहा ते बारा महिलांची टोळी फिरत असून ती लहान मुलांना पळवून नेते, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली. या अफवेमुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरोघरी सामान विक्री करणाऱ्यांना पकडून त्यांची चौकशी केली. अशातच २१ जूनला रात्री घडलेल्या घटनेने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. नागरिकांनी एका महिलेला संशयावरून पकडले आणि चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमांवर प्रसारित केली. ही महिला मुलं पळवते, अशी अफवा यानंतर पसरली. या चित्रफितीमुळे शहरात गोंधळ उडाला आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला.

चौकशीदरम्यान धक्कादायक सत्य समोर आले. ही महिला मुले पळवणारी टोळीची सदस्य नसून, एक मनोरुग्ण आहे. तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, ती दोन मुलांची आई आहे आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वसनीय माहितीवरच विश्वास ठेवा

या माहितीमुळे पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि अफवेवर पडदा पडला. खोट्या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती पसरते. कुणीही अशा अफवांचा प्रसार करू नये. तसेच, अशा घटनांमुळे समाजात गैरसमज पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि केवळ विश्वसनीय माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी केले आहे.