चंद्रपूर:शहरातील निसर्गरम्य अशा रामबाग ग्राऊंडवर अचानक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू व युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. या मैदानावर काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक व खेळाडूंनी प्रशासनाला हे काम बंद करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर या मैदानावर कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदल्यानंतर संतप्त नागरिकांनी बुधवार द ७ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद पाडले.

रामबाग ग्राउंड येथे मागील एक आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. शहरातील फुटबॉल , क्रिकेट तसेच इतर खेळासाठी एकमेव क्रीडांगण आहे. चांदा क्लब ग्राउंड शहरात असले तरी त्या ग्राऊंडवर नेहमीच विविध शासकीय कार्यक्रम, तसेच इतर कार्यक्रम, मेळावा सुरू असतो. त्यामुळे शहरात खेळ खेळण्यासाठी ग्राउंड नाही. अशातच रामबाग नर्सरी येथे एकमेव शिल्लक असलेले ग्राउंड आहे. मात्र त्या ग्राऊंडवर देखील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम सुरू आहे.

या ग्राउंडला आज सर्वांज एकत्र येत विरोध केला. यावेळी मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व राजेश अडुर यांचेसह श्रीकांत भोयर,रविंद्र माडावार,दौलत साटोणे, नवनाथ देरकर, प्रवीण कुमार वडलोरी, माधव डोडाणी, तपन दास, कोमील मडावी,राहुल ठाकरे,प्रफुल बैरम,अक्षय येरगुडे,अमुल रामटेके,अमोल घोडमारे इत्यादी नागरिक व खेळाडू उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे नवीन इमारतीचे बांधकाम बंद पाडण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामबाग मैदानावर निर्णायक बैठक

रामबाग ग्राऊंड ५० वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्काचे ग्राउंड आहे, येथिल नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, इथे सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, इथे कोणत्याही इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही,नाही म्हणजे नाही असा दृढ संकल्प नागरिक व खेळाडूंनी केला आहे. याबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी उद्या गुरुवार ८ मे रोजी सकाळी ७ वाजता रामबाग मैदानावर निर्णय बैठक घेण्यात येणार आहे. ‘सेव्ह रामबाग ग्राऊंड, रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती’ च्या बॅनरखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक-युवती व खेळाडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले आहे.