चंद्रपूर: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन इसमांनी एका तरूणाची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुल शहरात उघडकीस आली आहे. साईश्वर भालचंद्र पुलगमवार असे फसवणूक झालेल्या तरूणांचे नाव आहे. याप्रकरीण मुल पोलिस ठाण्यात राजेश उर्फ राजू पुद्दटवार (रा. गुजरी चौक, मुल) व प्रशांत उर्फ नाना आक्केवार (रा. पंचशील वॉर्ड, मुल) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू पुद्दटवार व नाना आक्केवार या दोघांनी नगर परिषद, मुल येथे बाबू पदावर शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १० लाख ५० हजारांनी लुटले. साईश्वर यांचे भाऊजी दिगंबर डुग्गेवार यांच्यामार्फत या आरोपींची ओळख झाली होती. राजेश पुद्दटवार नगर परिषदेतच बाबू पदावर कार्यरत असून, त्याने आपल्या सहकाऱ्यासह, प्रशांत आक्केवार याच्या मुंबईतील ‘ओळखींच्या’ आधारावर ही नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन करून टप्प्याटप्याने रक्कम मार्च २०२५ ते २६ एप्रिल २०२५ या काळात गुगल पे तसेच नगद स्वरूपात एकूण १० लाख ५० हजार रुपये घेतले.
नोकरीबाबत काहीही लिखित न मिळल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साईश्वर पुलगमवार यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. दरम्यान तक्रार दाखल करून २४ तास उलटूनसुध्दा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मुख्याधिकारी यांच्याशी प्रकरण आणखी समजावून घेवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करणार असल्याचे मुल पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात राजेश-नाना जोडीने अनेक युवकांकडून करोडो रूपये वसुल केले असून, या दोघांसोबत आणखी कोण बडे आसामी आहेत याची चौकशी होणे आवश्यक आहे.