नागपूर : ओवैसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील तर सत्तेच्या लालसेपोटी तेच ओवैसीकडे जातील. ठाकरेंची एवढी वाईट स्थिती होईल याचा महाराष्ट्राने विचारही केला नव्हता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे शनिवारी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ज्या समाजवादी पक्षाने रामचरित मानस जाळले, त्या समाजवादी पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. त्यांनी किती खालची पातळी गाठली आहे. भाजपाला विरोध करण्यासाठी ओवैसी त्यांच्याकडे आले नाही तरी एमआयएमसोबत युती करण्यासाठी ठाकरे ओवैसीकडे जातील, असेही बावनकुळे म्हणाले. कसबा आणि चिंचवडमधील जनता भाजपाच्या पाठिशी असल्यामुळे भाजपाचे उमेदवार जिंकणार. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार उपोषण करत स्टंटबाजी करत आहेत. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असून त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – सावधान ! घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील १.५१ लाख शेतकर्‍यांनाच मिळणार बोनस

एखाद्या कुटुंबात जेव्हा मूल होत नाही तेव्हा दुसऱ्याचे मुल आणून बारसे केले जाते. संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतरणाबद्दल ठाकरे गटाचे तसेच आहे. एवढे दिवस सत्ता गाजवली तेव्हा नामांतरणाचा विचार केला नाही. मात्र सरकार अल्पमतात असताना नामांतराचा देखावा केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नामांतरणाबाबत केवळ घोषणा केली नाही तर करून दाखविले, असेही बावनकुळे म्हणाले.