नागपूर : विधानसभा निवडणुकीमुळे मध्ये लाडकी बहीण योजनेमुळे भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजप आणि मित्र पक्षांनी राज्यात सत्ता स्थापन केली. आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून यासाठीही सर्वात आधी भाजपने तयारी सुरू केलेली आहे. यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे भाजपला मोठे यश मिळण्याचे अपेक्षा आहे. अशातच महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवारांची अमान्यत रक्कम जप्त करण्याचे आवाहन केले आहे. नागपूरमध्ये झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे मेळाव्यात बावनकुळे नेमके काय म्हणाले पाहूया.

भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतुन विकासाचे राजकारण केले आहे. याउलट काँग्रेसने जाती- जातीमध्ये भांडणे लावून विनाशाचे राजकारण केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप ला मोठ्या फरकाने विजयी करत काँग्रेसची जमानत जप्त करा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कापसी खुर्द जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत हुडकेश्वर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या भागात आजवर सर्व विकासकामे भाजप पक्षाने केली आहे. यापुढे सुद्धा विकास कामे करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा तरच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी योग्य तऱ्हेने आपल्या भागात विकासकामांवर खर्च होईल. मात्र, काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर विकासाचा बट्ट्याबोळ करतील.

आपले सरकार हे लोक कल्याणकारी सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनाश्यक वस्तूंवरील कर कमी केला. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे जीवन सुकर होणार आहे. आपण भाजपला दिलेले मत किती महत्त्वाचे आहे याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते पूर्ण करणार आहोत. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, शेतकऱ्यांकडून मोटार पंपाचे वीजबिल घेणार नाही, सर्वसामान्य ग्राहकांची वीज दरवाढ करणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहेत. महसूल विभागाचा मंत्री म्हणून मी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल. आगामी निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. मात्र, नेत्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणार नाही. तर जनतेसाठी झटणाऱ्या जनसेवकाला तिकीट दिले जाईल, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करा. यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन श्री. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

यावेळी माजी आ. टेकचंद सावरकर,  माजी आ. सुधाकर कोहळे, भाजप जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत, जिल्हा महामंत्री अनिल निधान, अजय बोढारे, चंद्रशेखर राऊत, शुभांगीताई गायधने, सुनील कोठे, भोजराज घोडमारे, रुपराव शिंगणे, हरीश कंगाली, सुभाष गुजरकर, भगवान मेंढे, सुरज पाटील, सचिन घोडे, राजेंद्र राजूरकर, केशव सोनटक्के, संजय भोयर, हुडकेश्वर च्या सरपंच मीनाताई शेंडे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.