नागपूर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असल्याचा आरोप अनेक वेळा होत आहे. परंतु आता अंतरवली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अन् मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

अंतरवली सराटीमध्ये २ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे निघून गेले होते, परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी त्यांना पुन्हा आणून बसवले, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. ते नागपुरात समता परिषदेच्या मेळाव्यात बोलत होते.

शुक्रवारी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला येथे समता परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला होती. या बैठकीत पवार यांचा एक आमदार उपस्थित होता. बैठकीत दगडफेकीचा डाव होता, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विद्यमान महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयावरही सडकून टीका केली.

ते म्हणाले या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसला आहे, शासनाने तो एकतर मागे तरी घ्यावा किंवा त्यात सुधारणा तरी कराव्या. आरक्षणाचा आधारच सामाजिक मागासलेपणा आहे. पण त्याचा विचारच न करता सरकारने पावले उचलली आहे, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य शासनाने काढलेल्या जी.आर.बाबत भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले होते. हे येथे उल्लेखनीय.