शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेताच ऑन कॅमेरा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी थुंकलं होतं. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊतांनी सल्ला दिला होता. यानंतर राऊत आणि अजित पवार यांच्यात थुंकण्यावरून वाकयुद्ध रंगलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊतांच्या थुंकवण्याबद्दल अजित पवारांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, “प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी आम्हाला राजकीय सुसंस्कृतपणा शिकवला. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे.”

हेही वाचा : नाना पटोलेंच्या भावी मुख्यमंत्री फलकावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “मुख्यमंत्री होण्यासाठी आधी…”

“…पण कधी पळून गेलो नाही”

यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, “धरणातील पाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यापेक्षा थुंकणे केव्हाही चांगलं. ज्याचे जळतं त्याला कळतं. आम्ही भोगत आहोत पण कधी पळून गेलो नाही.”

“…तर महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास राहणार नाही”

याबद्दल नागपूर येथे छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले की, “महाविकास आघाडीत आपण एकत्र आहोत. एकमेकांवर शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे. एकत्र लढताना आपल्यात फूट आहे, असा जनतेत प्रचार-प्रसार झाला, तर महाविकास आघाडीच्या एकजुटीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे सर्वांनी बोलताना सांभाळून बोलावं,” असा सल्ला भुजबळांनी दिला आहे.

हेही वाचा : “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात आहे”; छगन भुजबळ यांची टीका, म्हणाले “पंकजा मुंडे यांच्या मनात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अमित शाहांना भेटणार असल्याचं…”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सांगितलं, “भाजपा पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे. अमित शाहांना भेटणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. बाकी राष्ट्रवादी प्रवेशावर मला कल्पना नाही,” असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं आहे.