नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. तो गेल्या चार दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तेथून तो थेट तेलंगणात पळाला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन तेलंगणातून अटक केली.

प्रशांत कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतरदेखील कोरटकर समोर आला नव्हता. आता त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. मात्र, त्याच्या निवासस्थानी तो आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर व मध्यप्रदेशमध्येदेखील त्याचा शोध घेतला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. नागपूर सायबर पोलीस ठाण्याचीदेखील मदत घेण्यात आली होती.

चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये प्रशांत कोरटकर मुक्कामी होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरात छापा घातला. मात्र, काही तासांपूर्वीच त्याला पोलिसांबाबत माहिती मिळाल्याने तो पळून गेला. फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र, अंतरिम जामीन मिळाल्याने कोरटकरला अटक करता येत नव्हती.

मात्र, तोपर्यंत कोरटकर ज्या वाहनातून तो फिरत होता. त्या वाहनाच्या मागावर कोल्हापूर पोलिसांचे एक पथक होते. कोरटकरने चंद्रपुरातून एका क्रिकेट बुकीच्या कारने पळ काढला. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्याने दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना तपासात अडचणी आल्या. अखेर कोल्हापूर पोलिसांना दुसऱ्या वाहनाचा देखील शोध लागल्याने तेलंगणा येथे जाऊन कोरटकरला बेड्या ठोकल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे नेमके प्रकरण

कोल्हापुरातील रहिवाशी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.