नागपूर : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघण्याचे आवाहन मराठा समाजाला केले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यावर भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

भाजप नेते व विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेचा समाचार घेतला. ते म्हणाले, जरांगे पाटील शिवाजी महाराजांच्या नावाने आणि शिवाजी माहराजांचे फोटो दाखवून आंदोलन करत आहेत आणि ते ज्या प्रकारची भाषा प्रयोग करत आहेत. त्यावर मी निश्चितच सांगतो, या प्रकारच्या खालच्या दर्जाच्या भाषेत कोणाच्या आईबाबत जरांगे बोलत आहे. जर आज शिवाजी महाराज असते तर त्यानी जरांगेची जीभ छाटली असती.

येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी याबद्दलची घोषणा एका पत्रकार परिषद केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईत येण्याचा मार्ग, मराठा समाजाच्या मागण्या यासोबतच विविध विषयांवर भाष्य केले आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. तर फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी माझा सल्ला समजावा किंवा इशारा समजावा असे म्हणत एक प्रकारे धमकावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी आपल्याला आया-बहिणींचा सन्मान कसा करावा हे शिकवले. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करताय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.

मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही , असे जरांगे म्हणाले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला अल्टिमेटम दिले. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय ,असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे.