गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी येथे आज बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. हा परिसर नक्षल कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असून नुकतेच याठिकाणी पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात येणाऱ्या अतिसंवेदनशील अशा पिपली बुर्गी येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते पोलीस मदत केंद्रातील विविध वास्तूंचे उद्घाटन पार पडले. पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या जनजागरण मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले की, गडचिरोली पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट आहे. जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत आहेत. विशेष अभियान पथकाचे तर केंद्रीय मंत्री देखील नाव घेतात. दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात जोडण्याची महत्वपूर्ण भूमिका पोलीस विभाग पार पाडत आहे. अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी पोलीस जवान व स्थानिक आदिवासी बांधवांसोबत दिवाळी व भाऊबीज साजरी केली. यावेळी विविध साहित्यांचे देखील वाटप करण्यात आले.

हेही वाचा >>>उपविभागीय अभियंत्याच्या ‘कार’मधून ५ लाख लंपास; खामगाव मधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळाव्याला पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अहेरी वैभव वाघमारे, केंद्रीय राखीव बल १९२ बटालियचे कमांडंट परविंदर सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे उपस्थित होते.