लोकसत्ता टीम

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढतच आहे आणि हेच वाघ आता गावात येऊन धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या वाघांवरुन मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यापूर्वीदेखील अनेकदा त्यांनी वाघांच्या विरोधातच वक्तव्य केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काकू व्याघ्रसंवर्धनाच्या विरोधात असल्याचीच चर्चा व्याघ्रसंवर्धकांमध्ये आहे. शोभाताई फडणवीस यांनी सातत्याने वाघांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या काकूंनी यापूर्वी देखील २०१४ मध्ये आमदार असताना पोंभूर्णा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. वनखात्यावर त्यांनी एवढा दबाव टाकला की त्यावेळी त्या वाघाला थेट गोळी घालून ठार करण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्येही त्यांनी धूमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा जंगल पेटवून देऊ, अशी थेट धमकीच दिली होती. तर आता पुन्हा एकदा त्यांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.

त्यामुळे त्यांना व्याघ्रसंवर्धन नको आहे का, असा प्रश्न आता वन्यजीवप्रेमी उपस्थित करत आहेत. चंद्रपूरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी थेट महायुती सरकारवरच निशाणा साधला आहे. वाघांना आमच्यापासून दूर घेऊन जा. वाघांची ‘ट्रान्सफर’ करा आणि बाहेर पाठवा. वाघांची संख्या वाढतच गेली तर आम्ही झाडावर राहू आणि वाघ खाली फिरत राहतील. आमची अवस्था का जंगली करणार आहात का, असा संतप्त सवाल शोभा फडणवीस यांनी सरकारला केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी बफर क्षेत्रात आठ पर्यटक प्रवेशद्वार होते. आता ते तिपटीने वाढले असून २४ पर्यटक प्रवेशद्वार झाले आहेत. या पर्यटनातून सरकारची तिजोरी भरत आहे, पण आमचे काय? आम्ही काय पशु खाद्य आहोत का? आम्हाला जगावेसे वाटत नाही का? आम्ही जगायचे नाही का? असा प्रश्नांचा भडीमारच त्यांनी महायुती सरकारवर केला आहे. वनखात्यानेही याचा विचार करावा आणि बफर क्षेत्रातील पर्यटन प्रवेशद्वार बंद करावे. वाघांना बाहेर पाठवा, इथले वाघ कमी करा, आम्हाला सुरक्षितता द्या, नाही तर केव्हाही जनतेच्या भावनांचा उद्रेक होवू शकतो, असा इशारा शोभा फडणवीस यांनी दिला.