नागपूर : रेल्वेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी, विधवा मुलगी, अल्पवयीन मुलगा किंवा परित्यक्ता मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन (फॅमिली पेंशन) मिळण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात ही प्रक्रिया फारशी सोपी नाही. रेल्वेच्या कार्मिक विभागामार्फत पेंशन मिळवण्यासाठी मृत कर्मचाऱ्याचे संबंधित लाभार्थ्यांसोबतचे नाते सिद्ध करणे अनिवार्य असते. यासाठी अनेक वेळा अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते, ज्यामुळे लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
या प्रक्रियेत अडथळे निर्माण करून काही कर्मचारी लाभार्थ्यांकडून लाच मागतात, अशा अनेक तक्रारी सतर्कता विभागाकडे दाखल झाल्या आहेत. अलीकडेच नागपूरमध्ये अशाच एका प्रकरणात २५ हजारांची लाच घेताना एक मुख्य अधीक्षक रंगेहात पकडले गेले. रेल्वे प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. पारदर्शक प्रक्रिया राबवून पेंशनसारखा हक्काचा लाभ गरजू कुटुंबीयांपर्यंत सहज पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील मुख्य अधीक्षक रोशन कुंभलवार यास सतर्कता विभागाने २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पीडित महिला रेल्वे कर्मचाऱ्याने कौटुंबीक निवृत्ती (फॅमिली पेन्शन) सुरू करून देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याची तक्रार केली होती.सतर्कता विभागाने या तक्रारीवर चौकशी करून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता डीआरएम कार्यालय परिसरात सापळा रचला. या दरम्यान, कुंभलवार यांनी महिला कर्मचाऱ्यांकडून २५ हजार रुपये स्वीकारले आणि त्यानंतर आपल्या जागेवर परतले. त्याच वेळी सतर्कता पथकाने त्यांना अडवले.
झडतीदरम्यान, त्यांच्या खिशात सरकारी खजिन्यातून पुरवलेल्या नोटा सापडल्या, जी लाच म्हणून घेतलेली असल्याचे त्यांनी कबूल केले. ही कारवाई मध्य रेल्वेच्या सतर्कता विभागाने केली असून, लाचखोरीप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाकडून लाचखोरीविरोधात कठोर भूमिका घेण्यात येत असून, संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. रेल्वेतील फॅमिली पेंशन ही सेवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मिळणारी आर्थिक मदत आहे. ही पेन्शन प्रामुख्याने मृत कर्मचाऱ्याची पत्नी, अल्पवयीन मुले, विधवा किंवा परित्यक्ता मुलगी यांना दिली जाते. लाभार्थ्यांना नातेसंबंध सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे ही पेन्शन मंजूर होते. मात्र, कधी कधी प्रक्रिया जटिल वाटू शकते. फॅमिली पेंशनमुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळते आणि रोजच्या गरजांसाठी आधार निर्माण होतो.