लोकसत्ता टीम

नागपूर: नागपुरात करोनाचे संक्रमण वाढले असतानाच ‘इन्फ्लूएन्झा’, गोवरचेही रुग्ण आढळू लागले आहेत. उपराजधानीत घरोघरी विषाणूजन्य आजाराचे संशयित रुग्ण असल्याने नागरिक बेजार झाले आहेत.

नागपुरात मध्यंतरी ‘स्वाईन फ्लू’, ‘इन्फ्लूएन्झा’, गोवरचे रुग्ण वाढले होते. हे रुग्ण कमी झाल्यावर आता करोनाने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात करोनाचे संक्रमण झटपट वाढत असतानाच आता १ एप्रिल ते १२ एप्रिल २०२३ मध्ये शहरात एच १ एन १ (स्वाईन फ्लू) आजाराचे ३, एच ३ एन २ विषाणूचे ५, इन्फ्लूएन्झा बी विषाणूचे ७ नवीन रुग्ण आढळले. तर गोवरची रुग्णसंख्याही जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत ५५ रुग्णांवर पोहचली. शहरात मागील २४ तासांत ६६, ग्रामीणला ५६, जिल्ह्याबाहेरील ८ असे एकूण १३० नवीन रुग्ण आढळले. तर दिवसभरात शहरात १८, ग्रामीणला १५ असे एकूण ३३ रुग्ण करोनामुक्त झाले.

आणखी वाचा- खळबळजनक! गोमूत्रात १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू; संशोधकांचा दावा, थेट मानवी सेवनास असुरक्षित

करोनाचे आणखी दोन बळी

नागपुरातील रामदासपेठ येथील एका ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू खासगी रुग्णालयात नोंदवला गेला. तर दुसरीकडे ब्रम्हपुरी येथील एका २६ वर्षीय महिला संवर्गातील मृत्यूही मेडिकल रुग्णालयात नोंदवला गेला. जिल्हा मृत्यू विश्लेषण समितीकडून या सर्व मृत्यूंवर सूक्ष्म निरीक्षण होणार आहे. त्यानंतर या सर्व मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

सक्रिय रुग्णसंख्या पाचशे पार

शहरात बुधवारी ३५६, ग्रामीणला १७३, जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण ५४४ सक्रिय करोनाग्रस्त रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सौम्य लक्षणे असलेल्या ५१० रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहे. तर गंभीर संवर्गातील ३४ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळजी घ्या, आजार टाळा

नागपुरात करोना आणि इन्फ्लूएन्झाचे रुग्ण आढळत असले तरी त्याला घाबरण्याची गरज नाही. शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.