चंद्रपूर: शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूक मुख्य रस्त्यांने काढण्याची मागील अनेक वर्षाची परंपरा आहे. मिरवणुकीच्या स्वागतासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी मंडप उभारले जातात. अशाच मंडपावरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार या दोन गटातील कार्यकर्त्यांचा संघर्ष आता थेट रस्त्यावर आला आहे.

मुख्य रस्त्यावरील लोकमान्य टिळक शाळेजवळ दरवर्षी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मंडप टाकण्यात येतो. याच मंडपात भाजपाचे सर्व पदाधिकारी बसून गणपती व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतात. यावर्षी ६ सप्टेंबरचे विसर्जन बघता येथे स्वागत मंडप उभारण्यात येणार होते. या जागेवरून आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक रस्त्यावरच आमने सामने आले.

मिळालेल्या माहितीनुसार, २-३ दिवसांपूर्वी भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून परवानगी घेऊन तेथे तात्पुरते मंडप उभारले होते. तर दुसरीकडे, आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आणि महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्याच ठिकाणी भाजपचा महानगरचा मंडप उभारण्याच्या मागणीवर जोर धरला. यामुळे भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

विशेष म्हणजे हा वाद महापालिकेपासून रस्त्यापर्यंत पोहोचला. मंडपाच्या ठिकाणी मुनगंटीवार व जोरगेवार अशा दोन्ही दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही घटनास्थळी पोहोचावे लागले. या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की भाजपातील अंतर्गत कलह अजूनही संपलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने यात मध्यस्थी करित एक मंडप महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांना देण्याचे मान्य केले आहे. दरम्यान महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांचा मंडप येथे लागला तर मग हसन इलेक्ट्रॉनिक समोर आतापासूनच मंडप टाकून आरक्षित केलेली जागा कुणाची हा प्रश्न देखील पडला आहे. कारण दरवर्षी हसन इलेक्ट्रॉनिक समोर आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेडचा मंडप असतो हे विशेष.